पिंपरी: मस्करीचा जाब विचारल्याच्या रागातून एका अल्पवयीन मुलाने २१ वर्षीय तरुणावर कात्रीने हल्ला करत गळ्यावर गंभीर वार केल्याची धक्कादायक घटना वाकडमधील एकता कॉलनी येथे गुरुवारी रात्री घडली. या प्रकरणी वाकड पोलिसांनी संबंधित विधी संघर्ष बालकावर गुन्हा दाखल केला आहे.
या हल्ल्यात रामचंद्र दत्तात्रय सरकले हे तरुण जखमी झाले आहेत. तर, विष्णू विठ्ठल गायकवाड (वय २१, रा. डांगे चौक, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री विष्णू गायकवाड व त्याचा मित्र रामचंद्र सरकले जेवण करून त्यांच्या रूमकडे जात असताना, त्यांना रस्त्यात ओळखीचा प्रीतम आणि त्याचा मित्र – आरोपी (विधी संघर्ष बालक) भेटले. यावेळी आरोपीने मस्करी करत फिर्यादीच्या गालावर चपटा मारला.
त्यावर रामचंद्र सरकले यांनी ‘असंच का मारतोस?’ असा जाब विचारला. यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने काही अंतरावर असलेल्या मेन्स पार्लरमध्ये जाऊन कात्री आणली आणि सरकले यांना “तुला मारून टाकीन” अशी धमकी दिली. त्यानंतर गळ्यावर दोन वेळा कात्रीने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पोलीस तपास सुरू
या हल्ल्यात रामचंद्र जखमी झाले असून, वाकड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध विधी संघर्ष बालक म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.
महिलेची सात लाखांची फसवणूक
‘आधार कार्डचा आर्थिक गैरव्यवहारासाठी वापर झाला असून, तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे’ असे सांगून एका महिलेची तब्बल सात लाख २७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
Cyber Crime: गुन्हा दाखल झाला सांगितलं अन्…; महिलेची सात लाखांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी महिलेशी फोनवर संपर्क साधला. त्या व्यक्तींनी स्वतःला ‘आधार विभागाचे अधिकारी’ असल्याचे भासवले. आधार क्रमांक आर्थिक फसवणुकीसाठी वापरला गेला असून, त्या प्रकरणी मुंबईतील अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची भीती महिलेला दाखवण्यात आली. नंतर पीडितेला पोलिस पडताळणीसाठी प्रमाणपत्र मिळवण्यास सांगण्यात आले व एका मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे निर्देश दिले गेले. त्या व्यक्तीने महिलेकडून तिच्या बँक खात्याची तसेच अन्य वैयक्तिक कागदपत्रांची माहिती घेतली.