मुलाच्या प्रेमाची शिक्षा बापाला; मुलीच्या भावाच्या भयानक कृत्याने पुणे हादरलं!
पुणे : प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांचे राहत्या घरातून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली आहे. अपहरण नाट्यानंतर हडपसर पोलिसांनी केवळ १२ तासात अपर्हत वडिलांची सुखरूप सुटका करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. मुलीच्या भावाने आणि त्याच्या तीन साथीदारांनी मध्यरात्री दुचाकीवरून अपहरण केले होते.
अभिजीत दत्तात्रय भोसले (वय २२), रणजीत रमेश डिकोळे (वय २१) व मारूती अशोक गायकवाड (वय २३) अशी पकडलेल्या तिघांची नावे आहेत. तर, साथीदार सागर खुरंगळे हा पसार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. याबाबत हडपसर पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे) निलेश जगदाळे, सहाय्यक निरिक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे व त्यांच्या पथकाने केली आहे.
अपर्हत व्यक्ती कुटूंबासह हडपसरमधील विठ्ठलनगर येथे राहण्यास आहे. तर, यातील मुलगी वाघोली भागात राहण्यास आहे. दरम्यान, अपर्हत व्यक्तीच्या मुलाचे व मुलीचे प्रमेसंबंध होते. परंतु, मुलीच्या कुटूंबियांचा त्यांच्या प्रेमास विरोध होता. त्यातच मुलगी ३ फेब्रुवारी रोजी मिळून न आल्याने कुटूंबियांना संबंधित मुलावर संशय आला. त्यामुळे कुटूंब मुलाच्या घरी आले. तेव्हा त्यांच्यात वादविवाद झाले. दोन्ही कुटूंबात वाद झाल्यानंतर मुलीचे कुटूंबिय तेथून निघून गेले.
दरम्यान, रात्री आकराच्या सुमारास पुन्हा मुलीचा एक नातेवाईक व त्याचे इतर तीन साथीदार मुलाच्या घरी आले. त्यांनी जबरदस्तीने मुलाच्या वडिलांना घरातून बाहेर आणले. त्यांना दुचाकीवर बसवत त्यांचे अपहरण केले. अपहरण नाट्यानंतर मुलाच्या आईने पोलीस नियत्रंण कक्षास अपहरणाची माहिती दिली. ही माहिती मिळताच हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांर्भिय ओळखत परिमंडळ पाचचे उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे व इतर अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी अपहरण कर्त्यांचा शोध सुरू केला. वेगवेगळी पथके तयार करून वाघोली, केसनंद तसेच हडपसर परिसर पिंजून काढला. पण, आरोपींचा शोध लागला नाही. मात्र, बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी हे अपर्हत व्यक्तीला घेऊन वाडे बोल्हई व केसनंद परिसरात फिरत आहेत. त्यानूसार, शोध घेत असताना आरोपी वारंवार ठावाठिकाणा बदलत होते. नंतर आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे जात असल्याचे समजले. तात्काळ सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे व पथकाने पाठलाग करून त्यांना पाटस टोलनाका येथे सापळा लवून पकडले. त्याच्या तावडीतून अपर्हत व्यक्तीची सुखरूप सुटका केली. तसेच, आरोपींना ताब्यात घेतले.