सौजन्य - सोशल मिडीया
पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटना वाढल्या असून, दररोज अपघातामध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. पुण्यातील पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. सकाळी रस्त्यावर धावण्याचा सराव करणाऱ्या विरेंद्र द्विवेदी या 42 वर्षीय आयटी अभियंत्याचा भरधाव कारच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 19 वर्षीय तरुणाने चालवलेल्या कारने द्विवेदी यांना जोरात धडक दिल्याची माहिती आहे.
या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी धडक देणारी इनोव्हा कार जप्त केली असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. विरेंद्र द्विवेदी हे दररोज सकाळी पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात सकाळी जॉगिंगसाठी जात होते. शुक्रवारी देखील ते नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेने धावत असताना एका अत्यंत वेगात आलेल्या इनोव्हा कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, द्विवेदी हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर त्यांना तातडीने त्याच कारमधून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
कारबाबत मोठी माहिती समोर
अपघाताची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेली इनोव्हा कार जप्त केली आहे. ही कार पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरच्या कंपनीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. या अपघातात कारचा वेग किती होता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण का सुटले, तसेच चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, चतु:शृंगी पोलीस परिसरातील सर्व सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. याशिवाय, संशयित चालकाची वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलिसांचा अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण आणि कार चालवणाऱ्या व्यक्तीची अधिकृत माहिती स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.






