मोशीत भीषण अपघात, टाटा बसची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा मृत्यू
पिंपरी : राज्यात अपघाताच्या घटना वाढल्या असून, पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मोशीतील पुणे-नाशिक महामार्गावर बुधवार (दि. २३) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव टाटा बसने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात बबलू नंदजी गुप्ता (वय ३७, रा. मोशी) यांचा मृत्यू झाला आहे. तर, दुचाकीवरील मागील आसनावर असलेले सुरेश राजमी कदम (वय ४३, रा. बो-हाडेवाडी, मोशी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गुप्ता आणि कदम हे बजाज डिस्कव्हर दुचाकी (क्र. MH 14 DS 0236) वरून जात होते. दरम्यान, भरधाव वेगात आलेल्या टाटा कंपनीच्या बसने (क्र. MH 14 GD 4460) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही बस आसाराम विठ्ठल बहीर (वय ५८, रा. तापकीरनगर, आळंदी) यांच्या चालकत्वाखाली होती.
धडकेनंतर गुप्ता रस्त्यावर पडले असताना बसचे मागील चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात सुरेश कदम यांच्या खांदा, गुडघा व पायाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी आरोपी बसचालकाविरोधात भारतीय दंड विधान कलम २७९ (हयगयपणे वाहन चालवणे), ३०४(अ) (दुर्घटनात्मक मृत्यू), ३३७, ३३८ व मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून, पोलीस उपनिरीक्षक इंगळे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
भरधाव कारच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू
भरधाव कारच्या धडकेत एका सायकल चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुणे स्टेशन परिसरात हा अपघात झाला आहे. याप्रकरणी पसार झालेल्या चालकावर बंडगार्डन पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. रामप्रतापसिंग महेसिंग राजावत (वय ५२, रा. भैय्यावाडी, ताडीवाला रस्ता) असे मृत्यू झालेल्या सायकल चालकाचे नाव आहे. याबाबत बिनीत सिंग (वय ४२, रा. वडाचीवाडी, उंड्री ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सोलापूरजवळ मध्यरात्री भीषण अपघात
सोलापूर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोलापूरहून तडवळच्या दिशेने जाताना हत्तूर शिवारातील नाईकवाडी यांच्या शेताजवळ कार उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारखाली सापडून डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्री झाला आहे. आशिष इरण्णा पनशेट्टी (वय ४०, रा. तडवळ, ता. अक्कलकोट) असे अपघातात मरण पावलेल्या डॉक्टरचे नाव आहे.