पुण्यात भीषण अपघात; सिमेंट मिक्सर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
पुणे : राज्यात अपघाताचे सत्र सुरुचं असून, राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरात वेगवेगळ्या दोन अपघातात दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव आणि हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी परिसरात या अपघाताच्या घडल्या आहेत.
लोहगाव येथील डी. वाय. पाटील महाविद्यालय रस्त्यावर सिमेंट मिक्सरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण स्वप्नील प्रकाश साळवे (वय २२, रा. भालकुंड, जि. परभणी) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सिमेट मिक्सरचालक वेंकट गुरुप्पा पवार (वय ४५, रा. खांदवे निवास, निरगुडी रस्ता, लोहगाव) याच्यावर विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माधव धोडिंबा साळवे (वय ५३, रा. डोंगरे वस्ती, निघोज, चाकण) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार स्वप्नील सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास लोहगाव येथील डी. वाय. पाटील महाविद्यालय रस्त्याने जात होता. त्यावेळी भरधाव सिमेंट मिक्सरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने स्वप्नीलला रुग्णालयात दाखल केले. पण, त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी न थांबता चालक पसार झाला. पसार झालेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अक्षय सोनवणे करत आहेत.
हडपसर-सासवड रस्त्यावर फुरसुंगी परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सूरज शरद धायडे (वय २३, रा. फुरसुंगी, हडपसर) याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आकाश शरद धायडे (वय १९) याने फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सूरज रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हडपसर-सासवड रस्त्याने जात होता. तेव्हा पॉवर हाऊससमोर भरधाव वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या सुरजचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक तेहसीन बेग तपास करत आहेत.