पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात विचीत्र अपघात; भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तरुण अडकला अन्...
पुणे : राज्यासह देशभरात अपघाताच्या घटना वाढल्या आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज अपघाताच्या भीषण घडना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातील कोरेगांव पार्क परिसरात एक विचीत्र अपघात घडला आहे. मैत्रिणीला घेऊन दुचाकीने निघालेल्या तरुणाला पाठिमागून आलेल्या दुसऱ्या दुचाकी चालकाने धडक दिली. यामध्ये तो तरुण आणि त्याची मैत्रिण खाली कोसळले. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या भरधाव टेम्पोच्या चाकाखाली तो तरुण सापडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शिवम सिंग (वय २२, रा. एअरफोर्स स्टेशन, विमाननगर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दुचाकीस्वारासह टेम्पोचालक इंद्रजीत संजय नरोटे (रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिवम सिंग याची बहीण नेहा (वय २०) हिने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शिवम आणि त्याची मैत्रीण कोरेगाव पार्क भागातून मंगळवारी ( १२ ऑगस्ट) सकाळी साडेदहाच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका दुचाकीस्वाराने शिवमच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेनंतर शिवमचे नियंत्रण सुटल्याने तो रस्त्यात पडला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने शिवमला धडक दिली. शिवम टेम्पोच्या चाकाखाली सापडला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. अपघातात त्याची मैत्रीण जखमी झाली. या अपघातानंतर शिवम आणि त्याच्या मैत्रिणीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान शिवमचा मृत्यू झाला. वरिष्ठ निरीक्षक सुनील थोपटे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या टेम्पोचालकासह दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ हंडाळ अधिक तपास करत आहेत.
राखी बांधून परतताना तरुणाचा अपघाती मृत्यू
भाऊ-बहिणीच्या अतूट नात्यचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनासाठी बहिणीकडे जाऊन परतत असताना झालेल्या दुचाकी अपघातात अंबाजीचीवाडी (ता. पुरंदर) येथील गणेश बाळासो पवार (वय २४) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवार (दि.९) रोजी रात्री साडेनऊ च्या दरम्यान जुनी जेजुरी– कोळविहिरे मार्गावरील परिसरात हा अपघात घडला आहे. गणेश पवार हा शनिवार (दि.९) सकाळी अंबाजीचीवाडी येथून बारामतीमधील आपल्या आत्याबहिणीकडे रक्षाबंधनासाठी गेला होता. बहिणीने भावाला राखी बांधून त्याला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी मनोकामना केली. बहिणीने राखी बांधली, औक्षणही केले त्यांच्या गप्पाही रंगल्या. गप्पा मारून झाल्यावर रात्री तो दुचाकीवरून घरी परतत होता. परंतु मोरगावमार्गे येत असताना जुना जेजुरी – कोळविहिरे रस्त्यावर असलेल्या खराब रस्त्याच्या अवस्थेमुळे अचानक आलेल्या स्पीड ब्रेकरवर त्याची दुचाकी घसरली. यामुळे तो रस्त्यावर आदळला आणि डोक्याला गंभीर मार लागून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. अपघातानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले.