पुण्यात भीषण अपघात; ट्रकचा धक्का लागल्याने तरुणीचा जागीच मृत्यू
पुणे : ट्रकचा धक्का लागून पडल्याने दुचाकीवरील तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. २६) दुपारी सिंहगड रोड येथील तुकाईनगर भागात घडली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांत ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सई श्रीकांत भागवत (२०) असे अपघातात मृत्यू पडलेल्या तरुणीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सई ही सर परशुराम महाविद्यालयात बी. ए’च्या तृतीय वर्षाला शिकत होती. गुरुवारी दुपारी ती दुचाकीवरून कॉलेजहून घरी जात होती. तुकाईनगर येथून जाताना तिच्या दुचाकीला ट्रकचा धक्का बसला. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर पडली. यात तरुणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला असून सिंहगड रोड पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.
टेम्पोच्या धडकेत बालिकेचा मृत्यू
टेम्पोच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना खडकीतील सर्वत्र विहार भागात घडली. आईजा शेख असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याबाबत तिची आई झेबा शाहिन जाहिद शेख (वय २५, रा. सर्वत्र विहार, एम. ई. एस. काॅलनी, लेबर कॅम्पसमोरील रस्ता, खडकी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, गुरुवारी (२६ जून) दुपारी बाराच्या सुमारास आईजा शेख ही घरासमोर खेळत होती. त्यावेळी तेथून निघालेल्या भरधाव टेम्पोच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाे चालकाचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पटेल तपास करत आहेत.