आरोपीचा मित्र असल्यानेच झाली अटक; ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात नाव आलं अन्...
नागपूर : अटकेत असलेल्या आरोपीने मित्राचे नाव घेतले अन् त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. अर्जावरील सुनावणीदरम्यान आरोपीचा मित्र असणे म्हणजे गुन्ह्यात सहभागी असेलच असे होत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने ओवेशचा जामीन मंजूर केला.
नोकरीच्या शोधात असलेला ओवेश खान मिळेल ते काम करतो. त्याचे काही मित्र अवैध धंद्यात सहभागी असून, पोलिसांनी केलेल्या कारवाईत यशोधनगरातील मुरतजा अन्सारी, मोहम्मद सद्दाम व मोहम्मद वसीम या तिघांना ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात अटक केली होती. महत्त्वाचे म्हणजे ही घटना 23 फेब्रुवारीची असून, ऑटोत फिरत असलेल्या आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याकडून 16.95 ग्रॅम अमली पदार्थ आढळून आले. त्यानंतर न्यायालयाने तिघांना पोलिस कोठडी सुनावली. कोठडीत असताना, मित्र ओवेश खानही आमच्यात सहभागी असल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी गुन्हा घडल्याच्या जवळपास 12 दिवसांनंतर म्हणजेच 4 मार्चला चौकशीसाठी ओवेश खानला चौकीत बोलावले. तर 7 मार्चला त्याला अटक केली. त्याच्यावर ड्रग्ज विक्री करण्यासंदर्भात गुन्हा दाखल असून, ओवेशने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. त्याचे वकील अॅड. श्रीरंग भांडारकर, अॅड. अथर्व खडसे यांनी बाजू मांडताना न्यायालयाला सांगितले की, 4 ते 6 मार्चदरम्यान ओवेशने पोलिसांना तपासात सहकार्य केले. त्याच्याकडून कोणतेही अंमली पदार्थ जप्त न झालेले नाहीत. त्याचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास नसल्याचा तसेच समाजाशी असलेली बांधिलकी लक्षात घेण्याची विनंती करण्यात आली.
ओवेशने आपली निर्दोषता कायम ठेवली असून, तो खटल्यात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने ओवेशच्या अटकेतील प्रक्रियात्मक त्रुटींची दखल घेतली व त्याच्याविरुद्ध पुराव्यांचा अभाव असल्याचे नमूद करत सशर्त जामीन मंजूर केला.