एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार
केज : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही जास्त आहेत. असे असताना आता केज तालुक्यात गतिमंद तरुणीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेनंतर गावातील तरुणांनी काही वेळातच पळून गेलेल्या नराधम आरोपीस पकडून चांगला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे.
नराधम हाही दिव्यांग आहे. एक 25 वर्षांची गतिमंद तरुणी ही तिच्या भावजयीसोबत भावाच्या लहान मुलाला डोस देण्यासाठी आरोग्य उपकेंद्रात जात असताना त्यांच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील गोठ्यात थांबली होती. तिची भावजय ही जवळच असलेल्या आरोग्य उपकेंद्रात गेली होती. त्याचा गैरफायदा घेत आणि पाळत ठेवून गतिमंद तरुणी एकटीच असल्याची संधी साधून नानासाहेब भानुदास चौरे या नराधमाने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना घडली.
मुलाला डोस देऊन आल्यानंतर पीडित गतिमंद तरुणीच्या भावजयीने हा प्रकार पाहिला आणि तिने आरडाओरड केल्यानंतर हा नराधम त्या ठिकाणाहून पसार झाला. मात्र, गावातील तरुणांनी त्याचा शोध घेऊन त्याला गावात आणून नागरिकांच्या मदतीने चांगला चोप दिला. त्यानंतर याबाबतची माहिती केज पोलिसांना देण्यात आली. अत्याचाराची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले.
वैद्यकीय तपासणीसाठी नेलं रुग्णालयात
पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हजर केले. याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात नानासाहेब चौरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पिंक पथकाचे पोलिस निरीक्षक प्रकाश शेळके करत आहेत. यापूर्वीदेखील अवैध दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
आरोपी चौरे विवाहित
हे दुष्कर्म करणारा नराधम हा विवाहीत असून, त्याला पत्नी, मुले तसेच आई, भाऊ असा परिवार आहे. त्याच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वीच निधन झालेले आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता असून, या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी. त्याला गावात परत येऊ देऊ नये, अशा प्रतिक्रिया गावातून उमटत आहेत.