तिहेरी अपघातात ६ ठार
खामगाव : भरधाव बोलेरो एसटी बसवर आदळल्यानंतर मागून येणारी ट्रॅव्हल्स अपघातग्रस्त बसवर आदळली. या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले. हा अपघात खामगाव-शेगाव मार्गावर जयपूर लांडे फाट्यानजीक बुधवारी पहाटेच्या सुमारास झाला. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी जखमींना अपघातग्रस्त वाहनांतून बाहेर काढून तातडीने खामगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
या अपघातात बोलेरोमधील शिवाजी समाधान मुंडे (वय ४२, रा. शेगाव), शिवपाल (वय ३२, रा. मध्य प्रदेश), धनेश्वर मरावी (वय ३०, रा. मध्य प्रदेश), मोहनसिंग सरोदे (वय २०, रा. मध्य प्रदेश) व ट्रॅव्हल्समधील महेसनिसा शेख हबीब (वय ४५, रा. धुळे, मालेगाव) यांचा मृत्यू झाला तर २४ जण जखमी झाले आहे. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बोलेरो शेगाववरून खामगावकडे भरधाव निघाली होती.
दरम्यान, जयपूर लांडे फाट्यानजीक ब्रम्हांडनायक लॉन्ससमोर खामगावकडून परतवाडाकडे जाणाऱ्या एसटी बसवर बोलेरो आदळली. त्याचवेळी एसटी बसच्या मागून भरधाव येणारी नाशिक-अमरावती इंदाणी ट्रॅव्हल्स अपघातग्रस्त एसटी बसवर मागून धडकली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर काहीजण जखमी झाले. जखमींना खामगाव सामान्य रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. हा अपघात इतका भीषण होता की, बोलेरोचा चक्काचूर झाला असून, एसटी बस व ट्रॅव्हल्सचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातही अपघात
दुसरीकडेे, पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात भरधाव दुचाकी घसरून सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली. ही घटना तीन दिवसांपूर्वीच घडली होती. याप्रकरणी दुचाकीस्वारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जय भगवान अवघड (वय २२, सध्या रा. अक्षरा पीजी. लक्ष्मी चौक, हिंजवडी फेज एक) असे मृत्यू झालेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार शुभम भाऊसाहेब काकडे (वय २४, सध्या रा. अक्षरा पीजी. लक्ष्मी चौक, हिंजवडी, फेज एक) जखमी झाला आहे. याबाबत जय याचे वडील भगवान सुखदेव अवघड (वय ४८,रा. वाकळुनी, ता. बदनापुर, जि. जालना) यांनी वारजे माळवाडी पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.