कुरुंदवाड पोलिसांकडून अवैध धंद्यावर कारवाई सुरुच; एकाच दिवशी...
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला आरोपी रोहित ऊर्फ गणेश गुंडाजी नंदीवाले (वय 22, रा. कोथळी, ता. करवीर) सीपीआर रुग्णालयातून पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. या गंभीर प्रकारानंतर करवीर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल महेश दिलीप नाईक यांना निलंबित करण्यात आले असून, याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षकासह सात जणांविरोधात खातेनिहाय चौकशी सुरू झाली आहे.
पळून गेलेल्या आरोपीने सीपीआरमध्ये 15 मे रोजी वैद्यकीय तपासणीसाठी आणले असताना पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकत हिसडा मारून पळ काढला होता. त्यानंतर त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. या गंभीर दुर्लक्षामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली होती. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक बाबासाहेब सरवदे, उपनिरीक्षक नाथा गाळवे, महिला पोलीस मनीषा महाडिक, स्नेहल टकले, अंमलदार तानाजी गुरव, बळीराम पोतरे आणि अविनाश कांबळे यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे.
दरम्यान, आरोपी नंदीवाले पळून गेल्यानंतर थेट घरी गेला. कुटुंबीयांकडून त्याने 20 हजार रुपये घेतले. यानंतर तिरुपतीला गेला आणि तिथे दर्शन घेतल्यानंतर केस अर्पण केले. चेहरा ओळखू न यावा म्हणून त्याने हे पाऊल उचलले. तिरुपतीहून तो मिरजेकडे वळला आणि काही मित्रांना भेटला. पुढे राजस्थानकडे पलायन करण्याचा त्याचा बेत होता. मात्र, मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेतले. या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेतील हलगर्जीपणा समोर आला असून, वरिष्ठांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिस्तभंगाची कारवाई सुरू केली आहे.
पुण्यातही झाली होती यापूर्वी निलंबनाची कारवाई
दुसऱ्या एका अशाचप्रकारच्या घटनेत, काही महिन्यांपूर्वी येरवडा भागात मोक्कातील आरोपीने पोलिसांच्या तावडीतून बेड्यांमधून हात काढून पलायन केले होते. या प्रकरणात तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते. तिघेही येरवडा पोलीस ठाण्यात नेमणूकीस होते. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी निलंबनाचे आदेश दिले होते.