पुणे विमानतळावर 13 किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; चौघांना ठोकल्या बेड्या
पुणे : बँकॉकमधून पुण्यात होणार्या कोट्यवधी रूपयांच्या गांजा तस्करीचे रॅकेट कस्टम विभागाच्या गुप्तचार विभागाने (एअर इंटेलिजन्स युनिट) उघड केले. लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून प्रवाशांकडून तब्बल १३ किलो ७२२ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. याप्रकरणात मुंबई, ठाणे, वलसाड आणि पालघर येथील चार जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून गांजाची २६ पाकीटे जप्त करण्यात आली आहेत.
आलिया इलियास अन्सारी (वय २४), मोहम्मद कैफ अन्सारी (वय २३, सोनाजीनगर, मुंब्रा), जहिदहुसेन शेख (वय २९, रा. किल्ला परडी, वलसाड, गुजरात) अणि झैबुनिसा अमिन शेख (वय ४५, रा. धानानी नगररोड, भोईसर ईस्ट, पालघर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कस्टमच्या माहितीनुसार, इंडिगो विमानाने बँकॉकहून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या आलिया, मोहम्मद आणि जहिदहुसेन यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना थांबवून त्यांच्या बॅगेजची तपासणी केली. स्कॅनिंगमध्ये बॅगेतून तीव्र वास येत होता. पाहणीत व्हॅक्युम पॅक केलेले २६ पॅकेट्स सापडले. हिरवट रंगाचे सुकी वस्तू दिसून आल्यानंतर त्याची तपासणी केली. तेव्हा हायड्रोपोनिक गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पॅकेट्सचे वजन १३ किलो ७२२ ग्रॅम निघाले. आलिया त्याच्याकडे चौकशीत केली. त्यावेळी त्याने विमानतळाबाहेर त्यांचा हँडलर म्हणून जैबुनिसा थांबलेली आहे. असे सांगितले. कस्टमने तात्काळ त्या हॅन्डलर महिलेला ताब्यात घेतले. चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले.
दरम्यान विशेष सरकारी वकील ऋषीराज वाळवेकर यांनी युक्तीवाद केला की, आरोपींकडे सापडलेले गांजाचे वजन व्यावसायीक आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात कोट्यवधींची किंमत आहे. हा गांजा नेमका कोठे जाणार होता, तो कोठे पुरविला जाणार होता, हा तपास बाकी आहे. हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोपींची कोठडीत रवानगी करण्याची मागणी केली. पुढील तपास कस्टम विभाग करत आहे.