
फोटो सौजन्य: iStock
पाथर्डी तालुक्यात बुधवारी सकाळी सलग घडलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी पूर्ण परिसर हादरून गेले. एका दिवसात चार वेगवेगळ्या ठिकाणी तितक्याच वेगवेगळ्या कारणांनी घडलेल्या या मृत्यूंमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावागावात शोककळा पसरली आहे. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तर अनेकांच्या मनात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घाटशिरस येथे घडलेली घटना सर्वाधिक धक्कादायक ठरली. येथील भाउसाहेब शिवराम माळी (२५) आणि प्रियंका भाउसाहेब माळी (१९) या नवविवाहित दांपत्याने एकाच झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. साधारण वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. दोघेही प्रेमळ, मेहनती आणि कुटुंबवत्सल म्हणून परिसरात ओळखले जात होते. त्यांच्या या निर्णयाने गावकऱ्यांसह नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले असता दोघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले. घटना नेमकी का घडली याची माहिती अद्याप समोर आलेली नसून प्राथमिक चौकशी सुरू आहे.
दरम्यान, पाथर्डी शहरातील इंदिरानगर भागात दुसरी घटना घडली. येथील संजना सुनिल खुडे (२८, रा. नाथनगर) हिने घरातील छताच्या आधारास गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी तिची अवस्था पाहताच तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
तिसरी घटना साकेगाव येथे घडली. येथील अंबादास पाराजी वाघ (३०) या युवकाने ३१ ऑक्टोबर रोजी रात्री १.१० वाजता विषारी औषध प्राशन केले होते. तातडीने त्याला जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी अपार प्रयत्न केले; परंतु बुधवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
धक्कादायक ! गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार; घरी जाताना अपहरण केलं अन्…
अंबादासच्या अचानक घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने त्याच्या परिवारात शोककळा पसरली. गावकऱ्यांनाही याची मोठी खंत आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी नोंद केली असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नितीन दराडे तपास करत आहेत.
एका दिवसात चार मृत्यू, तेही आत्महत्येसारख्या गंभीर कारणामुळे हे निश्चितच चिंताजनक आहे. गावकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांनी या घटनांची दखल घेण्याची गरज व्यक्त केली आहे. लोकांमध्ये मानसिक आरोग्याविषयी जागृतीच्या अभावामुळे अशा घटना वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मतही पुढे येत आहे.