शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर अत्याचार (File Photo : Crime)
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढत आहेत. असे असताना आता छत्रपती संभाजीनगर येथे एका शिक्षकाने अकरावीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
नराधम शिक्षकाने प्रेमाचा तगादा लावून नकार मिळाल्यानंतर आपल्या साथीदारासह विद्यार्थिनीचे अपहरण करून गुंगीचे औषध पाजत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना दोन महिन्यांपू्र्वी घडली होती. आता याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी शिक्षक महेश विजय मखमले (रा. मलकापूर, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) आणि त्याचा साथीदार सिद्धेश्वर जायभये (कारचालक) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, 16 वर्षीय पीडितेच्या तक्रारीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील महाविद्यालयात प्रवेश घेताना शिक्षक महेश मखमले याला तिच्या आईचा मोबाईल क्रमांक मिळाला. तोच क्रमांक नंतर विद्यार्थिनीच्या वापरात असल्याचे लक्षात येताच, आरोपीने तिच्याशी संपर्क साधून प्रेमाची मागणी सुरू केली. ‘मी पत्नीला सोडून तुझ्यासोबत राहीन’, असे तो वारंवार सांगत होता. मात्र, विद्यार्थिनीने प्रत्येक वेळी ठाम नकार दिला.
परीक्षेवेळी विद्यार्थिनीवर दबाव
नंतर परीक्षेच्या वेळी आरोपीने महाविद्यालयात येऊन विद्यार्थिनीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वर्तनामुळे घाबरून विद्यार्थिनीने परीक्षा न देता परत शहरात आली. या नकारामुळे संतप्त झालेल्या आरोपीने आपल्या साथीदारासह छत्रपती संभाजीनगर गाठले आणि क्लास सुटल्यानंतर रस्त्यावरून जात असताना तिचे अपहरण केले.
शुद्धीवर आल्यानंतर आरोपीस विनवणी
आरोपींनी विद्यार्थिनीला जबरदस्तीने चारचाकीत बसवून तिला गुंगीकारक औषध पाजले. नंतर दर्गा परिसरातील एकांतस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. सायंकाळी शुद्धीवर आल्यानंतर शरीरावर जखमांचे चट्टे दिसल्याने विद्यार्थिनीने आरोपीकडे गयावया केल्या. त्यानंतर आरोपींनी तिला हॉस्टेलवर सोडले.
मैत्रिणीला सांगितल्याने प्रकरण उघडकीस..
सततच्या तणावामुळे विद्यार्थिनीने झोपेच्या गोळ्या घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या वागणुकीत बदल जाणवून मैत्रिणीने चौकशी केली. त्यावेळी विद्यार्थिनीने सर्व घडलेला प्रकार सांगितला. दोघींनी मिळून हा प्रकार पालकांना सांगितला आणि अखेर जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हेदेखील वाचा : Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले; पोलिसांचा वचक संपला?






