अहिल्यानगर : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थानच्या गैरकारभाराची गैरकारभाराचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. बनावट ॲप असेल किंवा अनावश्यक कर्मचारी भरती असेल याबाबत गेल्या काही दिवसांपासून शनी शिंगणापूर देवस्थान हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर नुकताच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनि देवस्थान मध्ये मोठा गोंधळ असल्याचे कबूल करत याबाबत चौकशी नेमली होती. यानंतर आज देवस्थानचे वरिष्ठ अधिकारी नितीन शेटे यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नितीन शेटे यांची आत्महत्या ही चौकशीच्या भीतीपोटी की राजकीय बळी? याबाबत शनिशिंगणापूर सह नेवासे तालुक्यामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
गावातील अनेक नागरिकांनी थेट आरोप करत म्हटले आहे की, देवस्थान व्यवस्थापनामध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक आर्थिक अनियमितता व निर्णय प्रक्रियेतील अपारदर्शकता सुरू आहे. काहीचे असे म्हणणे आहे की, “नितीन शेटे यांच्याकडे अनेक गोपनीय फाईल्स व माहिती होती, जी देवस्थानातील काही बड्या व्यक्तींना उघडं पाडू शकत होती.” त्यामुळे ही आत्महत्या नव्हे तर संशयास्पद मृत्यू असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली, याचा तपशील अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी संपूर्ण घटनेच्या मागे दबाव, धमक्या की काही मोठा कटकारस्थान आहे का, हे तपासाअंतीच उघड होईल.या घटनेनंतर स्थानिक राजकीय मंडळींनी मौन बाळगले आहे. शेटे यांच्या आत्महत्येचा संबंध कोणत्या बड्या नेत्यांशी आहे का, हे सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या या घटनेचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. नितीन शेटे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे कोण होते? देवस्थानातील घोटाळ्यांवर कोण प्रकाश टाकणार? असे प्रश्न उपस्थित राहिले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे फक्त आत्महत्या होती की काहीतरी लपवले जात आहे? असा प्रश्न देखील येथील नागरिक विचारू लागले आहेत. दरम्यान शेटे यांच्या आत्महत्या बाबत अद्याप देवस्थान कडून कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नसली तरी विश्वस्त व प्रशासकीय अधिकारी यांनी यावर अद्याप या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.