
हिंजवडी परिसरात 18 वर्षीय मुलीवर चॉपरने हल्ला; धक्कादायक कारणही समोर
ही घटना हिंजवडीतील साखरे वस्ती परिसरात सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास घडली आहे. हल्ल्यात तरुणीच्या हाताला, तोंडाला आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या असून, तिला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले आहे.
विवाहित प्रियकराकडून लग्नासाठी दबाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणी आणि आरोपी योगेश भालेराव यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. मात्र योगेश विवाहित असल्याने दोघांमध्ये वाद सुरु होते. योगेशच्या पत्नीला या नात्याची माहिती मिळाल्यानंतर ती त्याच्यापासून दूर गेली. त्यानंतर योगेशने संबंधित तरुणीवर लग्नासाठी तगादा लावल्याचे समोर आले आहे. दरम्यान, तरुणीचे दुसऱ्या एका तरुणाशी मैत्रीचे संबंध असल्याचे कळल्यानंतर योगेश संतप्त झाला. रागाच्या भरात त्याने दोन मित्रांच्या मदतीने ही हल्ल्याची योजना आखली.
आरोपी ताब्यात, तपास सुरू
हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे करत आहेत. पोलिसांनी प्राथमिक तपासात हल्ल्याचे कारण ‘प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद’ असल्याचे स्पष्ट केले आहे.