
धक्कादायक ! 8 वर्षांच्या चिमुकलीचा शिक्षकानेच केला विनयभंग; केसांना, पाठीला हात लावला अन्...
सिन्नर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता सिन्नर शहरात दुसरीत शिकणाऱ्या आठ वर्षांच्या विद्यार्थिनीचा शिक्षकाकडून विनयभंग झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. धोंडवीरनगर शिवारातील सॅक्रेट हार्ट पब्लिक स्कूलमध्ये ही घटना घडली.
सिन्नर पोलीस ठाण्यात याप्रकरणी शिक्षकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आय. एल. एम. विषय शिकवणाऱ्या सायकत प्रामाणिक या शिक्षकाने वर्गात तसेच अॅसेंब्ली हॉलमध्ये चिमुकलीच्या केसांना, छातीला व पाठीला हात लावून अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. तसेच बाथरूमकडे जाताना रस्ता अडविणे व वर्गात मुद्दाम तिच्याच बाकावर येऊन चिकटून बसण्याचे प्रकार घडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, चिमुरडीने आईला शिक्षकाच्या या वर्तनाबाबत माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. १६ व १९ जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेनंतर पालकांनी शाळा प्रशासनाकडे विचारणा केली असता कोणतेही सहकार्य करण्यात आले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थीनी मानसिकदृष्ट्या भयभीत झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
आणखी एका चिमुरडीसोबत असाच प्रकार
आणखी एका आठ वर्षाच्या मुली बाबत असाच प्रकार घडला असून, तिच्या पालकांनी मात्र घाबरून तक्रार देण्यास नकार दिला आहे. झाल्या प्रकाराबाबत संबंधित शाळा व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकांना शाळेच्या व्यवस्थापनाने अरेरावी केल्याचे मुलीचे आईने सांगितले. संबंधित शिक्षकाला पाठीशी घालत व्यवस्थापनाने कातडी बचाव धोरण अवलंबले आहे. आपल्या मुलीच्या बाबत जे घडले ते इतर बालिकांच्या बाबतीत घडू नये त्यासाठी पालकांनी सजग व्हावे, असे आवाहन संबंधित मुलीच्या आईने केले आहे. तसेच आपली मुलगी या शाळेत शिकण्यासाठी ठेवणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ
या गंभीर प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली चव्हाण करत आहे.
हेदेखील वाचा : Buldhana: लाडक्या बहीण योजनेच्या पैशांवर डल्ला! पत्नी माहेरी गेली अन् नवऱ्याने दुसरीच ‘बायको’ बँकेत उभी केली