रस्त्याच्या बाजूला झोपला अन् भयंकर घडलं; पुणे स्टेशन परिसरात भरधाव कारने एकाला चिरडलं
पुणे : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे स्टेशन परिसरातील सोहराब हॉलजवळ भरधाव कारच्या धडकेत रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कारचालकावर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरोज सुदर्शन बिश्वाल (वय ४५, सध्या रा. वडगाव शेरी, मूळ, रा. ओडिशा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सरोज मूळचा ओडिशाचा आहे. तो पुण्यात मजूरी करतो. १२ मे रोजी रात्री ताडीवाला रस्ता परिसरातील सोहराब हॉलजवळ रस्त्याच्या कडेला झोपला होता. रात्री भरधाव कारच्या चाकाखाली सापडला. अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता कारचालक पसार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर अधिक तपास करत आहेत.
भरधाव वेगातील कारची दुचाकीला धडक
पुणे शहरात अपघाताचे सत्र सुरूचं असून, गेल्या काही दिवसाखाली सिंहगड रोड परिसरात वडगाव उड्डाणपुलावर भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला आहे. यासोबतच सहप्रवासी मित्र गंभीर जखमी झाला आहे. कारवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट उड्डाणपुलावरुन रस्त्यावर कोसळली. कारमधील ‘एअर बॅग’ उघडल्याने सुदैवाने चौघे बचावले. कारमधील तिघांनी मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले आहे. कुणाल मनोज हुशार (वय २३, रा. चिंचवड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. तर सहप्रवासी मित्र प्रज्योत दीपक पुजारी (वय २३, रा. चिंचवड) हा जखमी झाला आहे. अपघात प्रकरणात चालक शुभम राजेंद्र भाेसले (वय २३, रा. प्राधिकरण, निगडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. अपघातात भोसले, त्याचे मित्र निखील मिलिंद रानवडे (वय २६, रा. ओैंध गाव), श्रेयस रामकृष्ण साेळंकी (वय २५, रा. चिंचवड), वेदांत इंद्रसिंग रजपूत (वय २८) हे जखमी झाले आहेत.