
क्रेन बाजूला घेण्यावरून वाद, टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
याप्रकरणी याकूब सय्यदखान (रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी जावेद रेहमानी, जुनेद रेहमानी, अली रेहमानी, परवेझ रेहमानी, आलम रेहमानी, काशिम रेहमानी, अक्तर रेहमानी (सर्व रा. कुदळवाडी, चिखली) व इतर वीस ते पंचवीस जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी यांचा क्रेन चालक रहमान खान व छोटा टेम्पोचालक ललावू रेहमानी यांच्यात क्रेन बाजूला घेण्यावरून वाद झाला. त्यामुळे टेम्पो चालकाने आरोपी जावेद यास बोलावून घेऊन क्रेनचालक रहमान खान याच्याशी वाद करीत असताना तेथे फिर्यादी यांचा मुलगा हैदर खान व इम्रान खान हे आले. ते वाद सोडवीत असताना त्यांना शिवीगाळ व हाताने मारहाण केली. त्यानंतर या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी दांडके, रॉड व कोयते घेऊन येत फिर्यादीला शिवीगाळ, धमकी देत मारहाण केली. तसेच क्रेनची काच फोडून नुकसान केले.
तासगावात मुलाने केला आईचा खून
एका तरुणाने दारुसाठी पैसे देत नाही म्हणून आपल्या जन्मदात्या आईची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं आपल्या आईला जमिनीवर पाडून तिला तलवारीने भोसकलं आहे. पोटच्या मुलानेच अशाप्रकारे जन्मदात्या आईचा खून केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तासगावमधील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये शांताबाई चरण पवार (वय ७०) या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शांताबाई यांचा मुलगा जगन चरण पवार (वय ४४) घरी आला. जगनला दारुचे व्यसन आहे. यावेळी जगन हा दारूच्या नशेत होता. रात्री उशिरा घरी आल्यानंतर जगन त्याच्या आईशी दारुसाठी पैसे देत नाही म्हणून वाद घालू लागला. पैशावरुन तीव्र वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतप्त झालेल्या जगनने आई शांताबाई यांना धक्का दिला. त्या खाली जमिनीवर कोसळल्या. यावेळी संतापाच्या भरात जगनने घरात असलेली तलवार काढली आणि जमिनीवर पडलेल्या आईला तलवारीने भोसकले. भोसकल्यामुळे शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला.