
सुरक्षारक्षक महिलेजवळ आला, थोडं बोलला अन्...; रांजणगावमधील संतापजनक प्रकार
शिक्रापूर : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. दररोज वेगवेगळ्या भागातून संतापजनक घटना उघडकीस येत असतात. वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अत्याचाराच्या घटनांना पोलिसांनी आळा घालण्याची गरज आहे. अशातच आता पुणे जिल्ह्यात एक संतापजक घटना घडली आहे. ऑटोलिव्ह कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा कंपनीच्या सुरक्षा रक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे रांजणगाव गणपती औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अली शेख पठाण (रा. शिरुर, जि. पुणे) याच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑटोलिव्ह कंपनीतील पीडित महिला नेहमीप्रमाणे कंपनीच्या मुख्य गेटवर रजिस्टरमध्ये नोंद करत असताना सुरक्षा रक्षक अली पठाण तेथे आला. त्याने महिलेजवळ येऊन तिच्याशी अश्लील आणि अपमानास्पद भाषेत संवाद साधत, तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या प्रकाराने घाबरलेल्या महिलेनं तत्काळ कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि नंतर थेट रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी अली शेख पठाण याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार विद्या बनकर करत आहेत.
भिगवणमध्ये महिलेवर अत्याचार
भिगवण परिसरातून पुण्याकडे जाण्यासाठी लिफ्ट मागणाऱ्या महिलेला दुचाकीवर बसवून तिला झाडीत नेहून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान पुणे ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीचे रेखाचित्र तयार करून त्याद्वारे आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पीडित महिला भिगवण येथील हायवे लगत पुण्याकडे जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभी होती. तेव्हा आरोपी तिथे आला. त्याने तिला “लिफ्ट देतो” असा बहाणा करत आपल्या दुचाकीवर बसवले. काही अंतर गेल्यानंतर आरोपीने माळद गाव परिसरातील रेल्वे पुलाजवळ गाडी थांबवून झाडीत अत्याचार केला. सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासातून पोलिसांनी जाक्या चव्हाण याला लिंगाळी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, दौंड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद महांगडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.