पुणे हादरलं! तरुणावर कोयत्याने हल्ला, हात मनगटापासून तोडला; कारण काय तर...
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्षांपूर्वी झालेल्या किरकोळ वादातून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या साथीदाराने एका चोवीस वर्षीय तरुणावर कोयत्याने हल्ला केला. त्याचा हात मनगटापासून तोडला असून, त्याच्या डोक्यावर व हात आणि पायावर वार करण्यात आले आहेत. तर त्याच्या एका मित्राला देखील मारले आहे. एकमेकांकडे रागात बघण्याच्या कारणावरून हा वाद झाला होता. ही घटना बिबवेवाडी परिसरात घडली.
पियुष पाचकूडवे (वय २४) हा हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तरुणावर ससून रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून, आणखी एक शस्त्रक्रिया केली जाणार आहे. त्यानंतर त्याचा हात पूर्वीसारखा होईल का हे समजणार आहे, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत बिबवेवाडी पोलिसांत गौरव मरकड याने तक्रार दिली असून, तोही यात जखमी झाला आहे. पोलिसांनी सागर सरोज याला अटक केली आहे. तर १६ वर्षीय अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी (६ जानेवारी) सायंकाळी साडेचार वाजता घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याचा मित्र पीयूष एकाच परिसरात राहायला आहेत. अल्पवयीन आरोपी आणि जखमीचे एक वर्षापूर्वी भांडण झाले होते. एकमेकांकडे बघण्यावरून हा वाद झाला होता. त्याचा राग अल्पवयीन मुलाच्या मनात होता. दरम्यान तक्रारदार तरुणाला फोन करून घटनास्थळी बोलवून घेतले. तो आला असता अचानक या दोघांनी त्याच्यावर कोयत्याने हलला केला. अल्पवयीन मुलाने त्याला पकडले आणि साथीदाराने पीयूषवर कोयत्याने वार केले. एका वारमध्ये त्याच्या हातावर कोयत्याचा घाव बसला. त्यात त्याच्या हाताचा पंजा तुटून रस्त्यावर पडला. तर, तक्रारदाराच्या डोक्यात कोयत्याने वार केले आहेत. घटनेनंतर दोघा जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून ससून रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पीयूषचा हाताचा पंजा जोडायचा प्रयत्न केला आहे. आणखी एका शस्त्रक्रियानंतर हात यशस्वी जोडला गेला आहे का, हे कळून येईल असे पोलिसांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : मी शेवटचं सांगतो, शहर सोडून जा, नाहीतर…; पोलीस आयुक्तांचा गुन्हेगारांना दम
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे.