कराड हादरलं! किरकोळ कारणावरून गोळीबार; लहान मुलगी गंभीर जखमी
कराड : सैदापूर (कराड) येथे पूर्व वैमनस्यातून एकावर गोळीबार केला आहे. यामुळे शहरासह परिसरात खळबळ माजली आहे. सैदापूर (कराड) येथे पूर्व वैमनस्यातून एकावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामुळे शहरासह परिसरात खळबळ माजली आहे. गोळीबारात हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप घोलप यांच्यासह त्यांची दहा वर्षांची लहान मुलगी गंभीर जखमी आहे. हल्लेखोरास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गावठी पिस्तूलसह १६ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सुरेश काळे (वय ३८, मूळ रा. तळबीड, सध्या सैदापूर) असे संशयिताचे नाव आहे. जखमींना कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सैदापूर येथील होली फॅमिली स्कूलच्या मागील बाजूस ओम कॉलनीतील अक्षरा रेसिडेन्सीमध्ये रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, ओम कॉलनीमध्ये अक्षरा गृहनिर्माण सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप घोलप गेली बारा वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर सुरेश काळे हे गेली पाच वर्ष राहतो. रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास काळे सोसायटीमध्ये आला. त्याने त्यांची दुचाकी रस्त्याच्या आडवी लावली, दरम्यान तेथून निघालेल्या अध्यक्ष घोलप यांनी काळेला दुचाकी बाजूला लावा, असे सांगितले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. यानंतर काळे तिथून निघुन गेला.
दरम्यान काही वेळाने काळे घोलप यांच्या घरी गेला. बोलायचे आहे असे म्हणत घरात घुसत काळेने गोळीबार केला. यातील एक गोळी घोलप यांच्या चेहऱ्याला लागली. तर मुलीच्या दोन्ही हातांनाही गोळी लागली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. घोलप कुटुंबीयांच्या आरडाओरडमुळे लोक जमले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळी, अशोक भापकर, फौजदार निखिल मगदूम, हवालदार सागर बर्गे यांच्यासह मोठा फौजफाटा दाखल झाला. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले.
हे सुद्धा वाचा : कराडमधील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; तब्बल ‘इतक्या’ महिलांची केली सुटका
गोळीबारानंतर काळेने स्वत: ला घेतले कोंडून
गोळीबाराची घटना घडल्यानंतर सुरेश काळेने स्वतः ला घरात कोंडून घेतले होते. त्याच्यासोबत त्याचे कुटुंब होते. त्याच्याकडे पिस्तूल असल्यामुळे पोलिसांनी सावधगिरीने दरवाजा उघडण्याची विनंती केली. दरवाजा उघडल्यानंतर काळेने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला शांत करत अचानक त्याला ताब्यात घेतले. मात्र, पिस्तूल कुठे आहे, तो सांगत नव्हता. पोलिसांनी शोध घेतला असता त्याच्या धान्याच्या मोठ्या बॅरैलखाली लपवून ठेवलेले पिस्तूल सापडले. त्यासोबत १६ जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत. संशयित काळे हा रेकार्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर २०१२ पर्यंत विविध गुन्हे दाखल आहेत, अशीही माहिती पोलिसांनी दिली.