पुणे स्टेशन परिसरात तरुणाला लुटले; गुंगीचे ओैषध असलेला रुमाल तोंडावर टाकला अन्...
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे स्टेशन परिसरात तरुणाला लुटल्याची घटना घडली. चोरट्यांनी गुंगीचे ओैषध असलेला रुमाल तरुणाच्या चेहऱ्यावर लावून त्याच्याकडील ४३ हजारांची रोकड चोरुन नेली आहे. दोन दिवसांपूर्वीच स्टेशन परिसरात रिक्षाचालक आणि साथीदारांनी चाकणणधील एका तरुणाला लुटल्याची घटना घडली होती. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मूळचा अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी गावचा रहिवासी आहे. तो कामानिमित्त गुरुवारी (२ डिसेंबर) पुण्यात आला होता. स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ परिसरात तो बसची चौकशी करत होता. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्याला गाठले. गुंगीचे ओैषध असलेला रुमाल त्याच्या चेहऱ्यावर लावला. रुमाल लावल्यानंतर तरुणाला गुंगी आली. चोरट्यांनी तरुणाच्या खिशातील ३३ हजारांची रोकड, तसेच डेबीट कार्ड काढून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी डेबीट कार्डचा गैरवापर करुन त्याच्या खात्यातून दहा हजारांची रोकड चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांची मोठी कारवाई; तरुणांचे अपहरण करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.