पुण्यात भावाने केला भावावर गोळीबार; प्रकृती गंभीर
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज राज्यातील वेगवेगळ्या भागातून, खून, गोळीबार, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील वाघोली भागातील केसनंद परिसरात चुलत भावावरच जमिनीच्या वादातून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री ही घटना घडली असून, गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुशील संभाजी ढोरे (वय ४२ वर्षे,रा. ढोरेवस्ती, केसनंद,नगर रस्ता) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी सचिन राजाराम ढोरे, गणेश चंद्रकांत जाधव, भिवराज सुरेश हरगुडे (तिघे रा. केसनंद, नगर रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जमिनीचा वाद सोडविण्यासाठी सुशील त्यांचे चुलत भाऊ दत्ता ढोरे यांच्याबरोबर वाडेबोल्हाई परिसरात गुरुवारी रात्री गेला होता. आरोपी सचिन व दत्ता यांच्यात जमिनीचा वाद सुरू होता. वादात सुशीलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी सचिन त्याच्यावर चिडला. सचिनकडे देशी बनावटीचे पिस्तूल होते. वादातून त्याने त्याच्याकडील बेकायदा बाळगलेल्या पिस्तुलातून सुशीलवर गोळीबार केला. पिस्तुलातून सुटलेली गोळी सचिन याच्या छातीत शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. गोळीबाराची माहिती मिळताच वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली.
देशी बनावटीचे पिस्तूल, एक काडतूस जप्त
सचिन याच्याकडून बेकायदा बाळगलेले देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले आहे. आरोपी सचिन याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी सचिन ढोरे, भिवराज हरगुडे यांना अटक केली आहे. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार गणेश पसार झाला आहे. आरोपीने बेकायदा बाळगलेले पिस्तूल कोणाकडून आणले ? यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी दिली.
एसटी बसमध्ये माथेफिरूकडून तरुणावर कोयत्याने वार
बारामती- इंदापूर या संत तुकाराम महाराज राष्ट्रीय महामार्गावर धावत्या एसटीमध्ये माथेफिरुने एकावर कोयत्याने वार करून स्वतःवरही वार करण्याचा प्रयत्न केला आहे, यानंतर एसटी बसमधून उतरून हातात कोयता घेऊन महामार्गावरून चालणाऱ्या या माथेफिरूला जीवाची बाजी लावून पोलीस कर्मचाऱ्यांनी जेरबंद केले आहे. ही घटना बारामती तालुक्यातील काटेवाडी परिसरातील संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर घडली आहे.