
उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा आला राग; महिलेच्या डोक्यातच घातला फरशीचा तुकडा
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता उधार दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली.
उधारीचे दिलेले पैसे मागितल्याचा राग मनात धरून एका कुटुंबाने शेजारील महिलेला शिवीगाळ करत मारहाण करून फरशीचा तुकडा डोक्यात मारुन डोके फोडले. ही घटना मंगळवारी (दि.४) दुपारच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील संतोषीमाता नगरात घडली. भगवान बाबुलाल फतपुरे आणि त्याच्या दोन अल्पवयीन मुली अशी महिलेला मारहाण करणाऱ्यांची नावे असून त्यांच्याविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मिरा आशोक फतपुरे (वय ३९, रा. संतोषी माता नगर, मुकुंदवाडी) यांनी फिर्याद दिली.
हेदेखील वाचा : Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले; पोलिसांचा वचक संपला?
दरम्यान, फिर्यादी मिरा फतपुरे यांनी आरोपी भगवान फतपुरे यास काही रक्कम उधार दिली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी ती रक्कम परत मागितली असता आरोपी संतापला होता. ३ नोव्हेंबर रोजी रात्री आरोपी भगवान हा दारूच्या नशेत आपल्या दोन मुलींसह फिर्यादीच्या घरासमोर आला व दरवाजा वाजवून शिवीगाळ करू लागला. फिर्यादीने दरवाजा उघडून पाहिले असता आरोपी उधारीच्या पैशावरून वाद घालू लागला.
महिलेच्या डोक्यात मारला फरशीचा तुकडा
वाद वाढल्यावर आरोपीच्या मुलींनी फिर्यादीचा उजवा व डावा हात पकडून धरला. तर भगवा फतपुरे याने हातातील फरशीचा तुकडा घेऊ फिर्यादीच्या डोक्यात मारला. यात फिर्यादी गंभीर जखमी झाली. तसेच जा तू पोलिसांत तक्रार केलीस तर तुझ्या पतीला आणि मुलाला जिवे मारीन अशी धमकीही दिली. प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.