छत्रपती संभाजीनगर हादरलं! महिनाभरात ३ खून, डझनभर चाकूहल्ले (Photo Credit - X)
अंकुश थोरात । नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवघ्या एका महिन्यात शहरात तीन खून आणि डझनभर चाकूहल्ल्यांच्या भयावह घटनांनी नागरिकांमध्ये असुरक्षिततेची मोठी भीती पसरली आहे. प्रेमसंबंध, जुने वाद आणि विशेषतः अमली पदार्थांच्या वाढत्या नशेतून घडणाऱ्या या सलग गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
शहरातील चित्र चिंताजनक
शहरातून आता पोलिसांचा वचक संपल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. एकीकडे पोलीस अमली पदार्थांवर कारवाईचे ढोल बडवतात, तर दुसरीकडे याच नशेतून तरुण चाकूहल्ले, चोरी आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांकडे वळत आहेत. पोलिसांच्या कारवाईतील सुस्तपणा आणि गुन्हेगारांचे वाढलेले बळ, हे शहरातील चित्र चिंताजनक बनले आहे.
१४ ऑक्टोबर रोजी जवाहरनगर परिसरातील एसएफएस मैदानावर एका किरकोळ घटनेने शहराला हादरवून सोडले. मैत्रिणीवरून झालेल्या वादातून, बालपणापासूनचा जिवलग मित्रच शत्रू ठरला. सचिन उर्फ जंगली मच्छिंद्र जाधव (२४) याने मित्र सुरेश उंबरकर याचा गळा धारदार शस्त्राने चिरून खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली, तरी असे वाद आधीच का थांबवले नाहीत, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
Delhi Crime: दिल्लीतील ‘Money Heist’ गँगकडून 150 कोटींची सायबर फसवणूक; ‘प्रोफेसर’सह तिघे अटकेत
३१ ऑक्टोबरला घेलीपुरा परिसरात समीर खान इनायत खान ऊर्फ मालेगाव (३०) या भाजी विक्रेत्याची जुन्या वैरातून हत्या करण्यात आली. धारदार शस्त्राने वार करून आरोपींनी त्याचा जीव घेतला. घटनेनंतर आरोपी फरार झाले, त्यापैकी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र एक आरोपी अजूनही पसार आहे. घटनेच्या रात्री परिसरात पोलीस गस्त नसल्याने गुन्हेगारांना मोकळे रान मिळाल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
३ नोव्हेंबर रोजी काबरानगर भागात झालेल्या घटनेत सुधाकर शेषराव ढेपे (४८) याने प्रेयसीच्या उपस्थितीत विशाल बंडू पाचकोर (३२) याचा लाकडी दांड्याने ठार मारले. हत्या लपवण्यासाठी मृतदेह नाल्याजवळ फेकून देण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजमुळे हा गुन्हा उघडकीस आला. मात्र, ही घटना पोलिसांच्या गस्तीतील आणि प्रतिबंधात्मक उपायांमधील ढिलाईची स्पष्ट साक्ष ठरली आहे.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून चाकूहल्ल्यांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. किरकोळ वाद, पैशांचे व्यवहार किंवा प्रेमसंबंध, कोणतेही कारण असो, युवक थेट शस्त्र वापराकडे वळताना दिसत आहेत. या सर्व घटनांमागे नशा आणि अमली पदार्थांचे वाढते सेवन हा समान धागा आहे. पोलीस अधूनमधून अमली पदार्थविरोधी मोहीम राबवून कारवाईचे प्रदर्शन करत असले तरी, वस्तुस्थिती अशी आहे की, शहराच्या अनेक भागांमध्ये अमली पदार्थांची तस्करी सर्रास सुरू आहे.
धक्कादायक ! डॉक्टर महिलेवर सातत्याने अत्याचार; व्हिडिओ, फोटोही काढले, विविध हॉटेलमध्ये बोलवायचा अन्…






