पलूसमध्ये अमली पदार्थाविरोधात एल्गार; नागरिकांसह विद्यार्थी रस्त्यावर उतरले
पलूस : अमली पदार्थावर निबंध व विक्रेत्यांवर कठोर कारवाईसाठी पलूसकर रस्त्यावर उतरले आहेत. सकाळी नऊ वाजता कुंडल वेसपासून शिवतीर्थापर्यंत सर्वपक्षीय फेरी काढण्यात आली. फेरीमध्ये पंडित विष्णू दिगंबर हायस्कूल, लक्ष्मणराव किर्लोस्कर महाविद्यालय, प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत अमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा, अशा घोषणा दिल्या. घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सहायक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
डॉ. अमोल पवार म्हणाले, आपल्या देशाचे भवितव्य म्हणून ज्या युवा पिढीकडे पाहिले जाते, ती युवा पिढी व्यसनाच्या आहारी चालली आहे. पलूस शहरात अनेक तरुण- तरुणी अमली पदार्थाचे व नशेचे इंजेक्शन घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. शहरात राजरोसपणे अमली पदार्थाची विक्री होत आहेत. याकडे प्रशासन डोळेझाक करत आहे. युवा पिढीला नशाबाजीपासून दूर ठेवण्यासाठी प्रशासनाकडून अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
सहायक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील म्हणाले, शहरामध्ये अमली पदार्थ विक्री अथवा सेवन खपवून घेणार नाही. अमली पदार्थांचे उच्चाटन करण्यासाठी पोलिस कटिबद्ध आहेत. अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांची माहिती कळवावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
‘मुलांवर संस्कार करणे गरजेचे’
डॉ. मिलिंद जोशी म्हणाले, युवा पिढी वाचवण्यासाठी समाजाला ठोस पावले उचलावी लागतील. पलूसचे हे आंदोलन केवळ एक मोर्चा नसून, प्रबोधन यात्रा आहे. आई-वडिलांनीही मुलांवर संस्कार करणे गरजेचे आहे. पालक व मुलांमध्ये सुसंवाद गरजेचा आहे. यावेळी अमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. फेरीचे आयोजन अमली पदार्थविरोधी जनजागृती समितीने केले होते. पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभव पुदाले, स्वाभिमानी विकास आघाडीचे दिलीप जाधव, कुस्ती कमिटीचे अध्यक्ष भरतसिंह इनामदार, क्रांती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, युवा सेना जिल्हाध्यक्ष विनायक गोंदिल, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव, सहायक पोलिस निरीक्षक सुशांत पाटील, गटनेते सुहास पुदाले, मुख्याध्यापक तानाजी करांडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, प्राचार्य अनिल सावंत, पलूस शहर भाजप अध्यक्ष रामानंद पाटील, नितीन खारकांडे, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रशांत लेंगरे, रावसाहेब गोंदिल, विष्णु सिसाळ, पी. एस. माळी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.