अशोक खरात Part 2! नाशिकच्या व्यावसायिकाच्या टॅबलेटमधून २०० अश्लील व्हिडिओ जप्त
ही घटना नाशिकमधील सातपूर या औद्योगिक परिसरात घडली. अलीकडेच एका नामांकित व्यावसायिकाच्या कार्यालयातून एक टॅबलेट चोरीला गेला होता. सुरुवातीला ही एक साधी चोरी वाटली, पण जेव्हा चोरांनी व्यावसायिकाला फोन करायला सुरुवात केली, तेव्हा या प्रकरणाने धोकादायक वळण घेतले. व्यावसायिकाने टॅबलेटमधील काही गोपनीय माहिती चोरांनी मिळवली होती. सातपूर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून याप्रकरणी चार संशयितांना रंगेहाथ अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील व्हिडिओंनी पोलिसांच्या तपासाला आता एक वेगळे वळण दिले आहे.
नाशिक पोलिसांच्या नोंदीनुसार, २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२ च्या सुमारास एका व्यावसायिकाला निनावी फोन आला. फोन करणाऱ्याने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ५० हजार रुपये घेऊन या आणि तुमचा टॅबलेट घेऊन जा,” असे सांगितले. घाबरलेल्या व्यावसायिकाने तात्काळ आपले कार्यालय गाठले असता, तिथे ठेवलेला टॅबलेट गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
थोड्याच वेळात आरोपींनी पुन्हा फोन केला, मात्र यावेळी खंडणीची रक्कम ५० हजारांवरून थेट १२ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. “तुमच्या टॅबलेटमध्ये तुमचे आणि प्रेयसीचे अंदाजे २०० अश्लील व्हिडिओ आणि फोटो आहेत, ते इंटरनेटवर व्हायरल करू,” अशी धमकी आरोपींनी दिल्याने व्यावसायिक हादरून गेले.
व्यावसायिकाने न डगमगता सातपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचला. रणनीतीनुसार, व्यावसायिकाला खंडणीचा पहिला हप्ता म्हणून १० हजार रुपये घेऊन आरोपींनी सांगितलेल्या ठिकाणी पाठवले. पैसे स्वीकारण्यासाठी आरोपी समोर येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना घेराव घातला आणि बेड्या ठोकल्या. अटक करम्यात आलेल्यांची नावे आकाश बाकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपत शिंदे अशी आहेत.
पण प्राथमिक तपासात आरोपींच्या ताब्यात असलेल्या टॅबलेटमधून १५० ते २०० आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने अश्लील व्हिडिओ आणि खाजगी डेटा एकाच टॅबलेटमध्ये असणे, हे केवळ वैयक्तिक प्रकरण आहे की यामागे एखादे मोठे रॅकेट सक्रिय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस आता या व्हिडिओमधील इतर व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम करत असून, या माध्यमातून इतर कोणाची फसवणूक झाली आहे का, याचाही शोध घेत आहेत.






