
पोलीस आयुक्तांच्या नावाचा गैरवापर, सहायक फौजदारावर निलंबनाची कारवाई; नेमकं प्रकरण काय?
नेमकं प्रकरण काय?
गोपनीय चौकशीत प्रवीण घाडगे यांनी आपल्या पदाचा तसेच पोलिस आयुक्तांच्या नावाचा वापर करून एका वादग्रस्त बिल्डरला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित बिल्डर अविनाश पवार याचे आंदेकर टोळीशी थेट संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार या प्रकरणाबाबत माहिती देताना म्हणाले, ‘प्रवीण घाडगे यांनी पुणे पोलिस आयुक्तांचे नाव वापरत सहायक पोलिस आयुक्त शंकर खटके यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. जमीन वाद प्रकरणात आंदेकर टोळीशी संबंधित असलेल्या बिल्डर अविनाश पवार याला मदत मिळावी, यासाठी हा दबाव टाकण्यात आला होता. मात्र, सहायक आयुक्त खटके यांनी कोणतीही मदत करण्यास स्पष्ट नकार देत हा प्रकार पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या निदर्शनास आणून दिला.
दरम्यान, जमीन वादाशी संबंधित काही पीडित तक्रार दाखल करण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयात आले होते. मात्र, अविनाश पवार याने तक्रार दाखल होऊ नये, यासाठी पीडितांवर विविध प्रकारचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ‘स्टॅनली’ नावाचा व्यक्ती मध्यस्थाची भूमिका बजावत होता. तपासात स्टॅनलीचा थेट संपर्क प्रवीण घाडगे यांच्याशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्टॅनलीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. घाडगे यांनी प्रकरण मिटवण्यासाठी आणि तडजोड घडवून आणण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केल्याची कबुली दिली. तसेच, आंदेकर टोळीशी संबंधित अविनाश पवार यांचे प्रकरण घेऊन तोच व्यक्ती प्रवीण घाडगे यांच्यापर्यंत पोहोचल्याचेही त्याने मान्य केले.’
पोलिस दलातील कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी त्यांच्या प्राथमिक कर्तव्यात कसूर करेल, तर त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल. प्रवीण घाडगेची विभागीय चौकशी सुरू आहे. या चौकशीनंतर बडतर्फीबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.