पिंपरीत एटीएम फोडून 20 लाखांची रोकड लांबवली; एकाच टोळीने रक्कम चोरल्याचा संशय
पिंपळे गुरव येथे रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ श्वेतायान समृद्धी कॉलनीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम सेंटर आहे. चोरट्यांनी अतिशय शिताफीने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला आणि तेथील एटीएम मशीन गॅस कटरने कापून त्यातील तब्बल २० लाख ३० हजार ८०० रुपयांची रोकड पळवली. पहाटेच्या वेळी घडलेल्या या चोरीच्या घटनेने एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चोरट्यांनी मशीन कापतानाच ती जाळल्याचेही तपासात समोर आले असून, यामुळे मशीनचे मोठे नुकसान झाले आहे. चोरी करताना आपली ओळख पटू नये, यासाठी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारला होता. याप्रकरणी तपब्रत जिबोतोष चक्रवर्ती यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याशिवाय, देहुरोड आणि काळेवाडी येथेही चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न फसला. सांगवी, काळेवाडी व देहूरोड पोलीस यांनी एटीएम फोडणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी पथक नेमले असून, पोलीस तपास करत आहेत.
आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश
तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना आरोपींची ओळख पटवण्यात यश आले आहे. आरोपींच्या मागावर पोलिसांची पाच पथके रवाना करण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सुदर्शन राठोड यांनी दिली.
१. पिंपरी-चिंचवडमध्ये किती एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या?
देहूरोड, काळेवाडी आणि पिंपळे गुरव अशा तीन ठिकाणी एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या.
२. चोरट्यांनी किती रक्कम चोरली?
पिंपळे गुरव येथील एटीएममधून २० लाख ३० हजार ८०० रुपये चोरले.
३. पिंपळे गुरवमध्ये एटीएम कसे फोडले?
चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापून त्यातील रोकड लंपास केली.






