Bangladeshi women who entered India illegally
पुणे: बांगलादेशातून घुसखोरीकरून भारतात आलेल्या एका तरुणीला पुणे रेल्वे स्थानक परिसरात पकडण्यात आले आहे. बंडगार्डन पोलिसांनी या तरुणीला पकडले असून, याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी मुसलमिया अब्दुल अजीज प्यादा (वय २७, रा. पश्चिम कोलागासिया, आमतुली, जि. बोरगुना, बांगलादेश) असे ताब्यात घेतलेल्या तरुणीचे आहे. याबाबत पोलीस शिपाई भाग्यश्री सागर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुसलमिया मंगळवारी सायंकाळी पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 6 येथे असलेल्या रिक्षाथांब्याजवळ थांबली होती. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकाला संशय आला. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. सखोल चौकशी केली असता ती बांगलादेशातून आल्याची माहिती मिळाली. तिच्याकडे पारपत्र तसेच भारतात प्रवेश करण्याबाबतची अधिकृत कागदपत्रे नव्हती. दलालाच्या मध्यस्थीने ती भारतात आल्याचे समोर आले. तिने बेकायदाशीररित्या भारतात घुसखोरी केल्याचे उघडकीस आले.
यानंतर तिला पोलीस ठाण्यात नेहून तिच्यावर पारपत्र कायदा, तसेच परकीय नागरिक आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला. मुसलमियाने भारतात का प्रवेश केला ? तसेच तिला पुण्यात कोणी आणले, यादृष्टीने तपास सुरू आहे. वरिष्ठ निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मुजावर तपास करत आहेत.
वर्षभरापूर्वी बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतून बांगलादेशी महिलांसह दलालांना ताब्यात घेतले होते, तसेच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केली होती. बांगलादेशी तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून भारतात आणले जाते. नंतर त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जाते, असे पोलिसांच्या यापुर्वी केलेल्या कारवाईतून समोर आलेले आहे. त्यादृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत.
दुसरीकडे मुंबईतील ठाण्यातूनही अशा बांगलादेशी महिलांना अटक कऱण्यात आली आहे. महाराष्ट्रात बेकायदेशीर वास्तव्यास असणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना ठाण्यात अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे मीरा भाईंदर-वसई विरार गुन्हे शाखेच्या मानव तस्करी विरोधी कक्षाने छापेमारी केली. या कारवाईत मीरा रोड आणि नया नगर भागातील दोन निवासी संकुलातून महिलांना पकडण्यात आले.
Mahayuti Oath Ceremony: 5 डिसेंबरला आझाद मैदानावर शपथविधी, मुंबईतील वाहतुकी
या महिलांशी बोलण्यासाठी दुभाषाची मदत घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांनी सांगितले. महिला दोन स्वतंत्र खोल्यांमध्ये राहत होत्या. तपासादरम्यान या महिलांकडे भारतात राहण्यासाठी वैध कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. या महिला कामाच्या शोधात अवैधरित्या भारतात दाखल झाल्या त्यानंतर त्या ठाण्यात राहू लागल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
पोलिसांनी विदेशी नागरिक कायदा आणि भारतीय पासपोर्ट कायद्यांतर्गत महिलांविरुद्ध दोन गुन्हे दाखल केले आहेत. मीरा रोड आणि नया नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण अवैध स्थलांतर आणि संभाव्य मानवी तस्करीशी संबंधित असू शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.