
Bhandara Accident News: भाजप खासदाराच्या वाहनाची दुचाकीला धडक; दोघे गंभीर जखमी, भंडाऱ्यात अपघाताने खळबळ
भंडारा : मध्यप्रदेशातील बालाघाटच्या भाजप खासदार भारती पारधी यांच्या वाहनाचा भंडारा जिल्ह्यात अपघात झाला. तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील उसर्रा येथे खासदारांच्या वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. सुरजित सिंग आणि तसमिरा मेहरा अशी जखमींची नावे आहेत. त्यांना तातडीने भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार भारती पारधी या बालाघाटहून नागपूरच्या दिशेने अपघातग्रस्त वाहनातून प्रवास करत होत्या. त्यावेळी भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या उसर्रा येथे हा अपघात घडला. वाहनाची दुचाकीला धडक बसल्याने त्यावरील दोघे गंभीर जखमी झाले. जखमी सुरजित सिंग आणि तसमिरा मेहरा हे पंजाबमधील रहिवासी असून भंडारा जिल्ह्यात भात कापणीच्या कामासाठी हार्वेस्टरवर मजूर म्हणून आले होते, अशी माहिती आहे.
हेही वाचा: तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…
अपघाताची माहिती मिळताच आंधळगाव पोलिसांनी घटनाप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले आहे. या अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केल्याने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान, या अपघातात खासदार भारती पारधी यांना दुखापत झाली की नाही, याबाबत दिलेल्या माहितीत स्पष्टता नाही.
दुसरीकडे, भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील शासकीय धान्य गोदामातून ३६१ कट्टे तांदूळ चोरी झाल्याचे प्रकरणही समोर आले आहे. या प्रकरणात साकोली पोलिसांनी तपास करून ११ जणांना अटक केली आहे. यामध्ये गोदामात हमालीचे काम करणारे मजूर तसेच गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि राईस मिल संचालक संजय पुस्तोडे यांचा समावेश आहे. गोदाम व्यवस्थापक दीपक चौधरी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान गिरोला हेटी येथील राईस मिल संचालक संजय पुस्तोडे याला ताब्यात घेतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती आहे. पोलिसांनी या प्रकरणात पिकअप वाहनासह चोरीला गेलेला ५ लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचा तांदूळ जप्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.