भाजप आमदाराच्या मामाचा शेजाऱ्यानेच काढला काटा; कारणही आलं समोर
पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा शेजारी राहणाऱ्या तरुणानेच ५ लाखांची सुपारी देऊन त्यांचे अपहरण व खून घडवून आणल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैयक्तिक वादातून ही सुपारी देण्यात आली असल्याचेही पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. याप्रकरणी पवन श्यामकुमार शर्मा (वय ३०, रा. धुळे ), नवनाथ अर्जुन गुरसाळे (वय ३२, रा. फुरसुंगी ) तसेच अक्षय हरीश जावळकर आणि विकाश शिंदे यांना अटक केली आहे. तर, इतरांचा शोध सुरू असून, आतापर्यंत या गुन्ह्यात पाच जणांचा सहभाग समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांत अपहरण व खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी १२० ब नुसार कलम वाढ केली आहे.
आमदार टिळेकर यांचे मामा सतीश तात्याबा वाघ (वय ५८) हे सोमवारी (९ डिसेंबर) पहाटे साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर कारमधून आलेल्या चौघांनी त्यांचे अपहरण केले. कारमध्येच त्यांचा गळा दाबून तसेच दांडक्याने व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. खुनानंतर वाघ यांचा मृतदेह उरळी कांचन परिसरातील शिंदवणे घाटात टाकून आरोपी पसार झाले. हा सर्व प्रकार अवघ्या तासा भरात घडला होता.
दरम्यान अपहरण झाल्यानंतर पुणे पोलिसांची पथके अपहरणकर्ते तसेच वाघ यांचा शोध घेत होते. परंतु, सायंकाळपर्यंत त्यांचा थांगपत्ता लागला नव्हता. दरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास वाघ यांचा मृतदेह आढळून आला. नंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी शर्मा व गुरसाळे यांना पकडले. त्यांच्या प्राथमिक तपासात सुपारी देऊन अपहरण व खून झाल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवत सुपारी देणाऱ्या अक्षय जावळकर याला ताब्यात घेतले. चौकशीत अक्षय जावळकर हा पुर्वी भाडेकरू म्हणून सतीश वाघ यांच्याकडे राहत होता. त्यांच्यात पुर्वीची वादावादी होती. त्यावरून अक्षय याने शर्मा याला ५ लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून घडवून आणल्याचे समोर आले. पोलिसांनी अक्षय व विकास शिंदे यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. आरोपींकडे सखोल तपास सुरू असून, ठोस कारण समोर आलेले नाही. खूनात आतापर्यंत ५ जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. तर कोणी सहभागी आहे का, याचाही माहिती घेतली जात आहे.
हे सुद्धा वाचा : चोरट्यांची पण कमालच! चक्क पोलीस चौकीसमोरच ज्येष्ठाचा मोबाइल हिसकावला
पाच महिन्यांपासून वाघ यांच्यावर पाळत..!
अक्षय जावळकरने चार ते पाच महिन्यांपुर्वी शर्मा याला सतीश वाघ यांच्या खूनाची ५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. तेव्हापासून आरोपी त्यांच्या मागावर होते. घटनेच्या चारदिवस आधी शर्मा याने साथीदार गुरसाळे, शिंदे व आणखी एका साथीदारासोबत घेऊन वाघ यांच्या दिनक्रमाची माहिती घेतली. तत्पुर्वी त्यांनी जावळकर याच्याकडून काही रक्कमही घेतली होती. घटनेच्या दिवशी शर्मा, गुरसाळे, शिंदे व आणखी एक चौघांनी वाघ यांचे मॉर्निंग वॉकला आल्यानंतर अपहरण केले. गाडीच्या डिक्कीत टाकून त्यांचा चालत्या गाडीत खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह घाटात टाकल्याचे समोर आले आहे.
गुन्हा गंभीर असला तरी तो वैयक्तिक कारणातून घडला आहे. पोलिसांनी जवळपास साडे चारशे सीसीटीव्ही पडताळत युद्धपातळीवर तपास करून तिघांना अटक केली असून, या गुन्ह्यात १२० ब नुसार कलम वाढ केली आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. आरोपींना कडक शिक्षा होईल अशीच कारवाई होईल. पुणे पोलीस शहरातील कायदा-सुव्यवस्था आभादीत ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी सज्ज आहेत. ही घटना वैयक्तिक कारणातून घडली आहे. जनतेला विश्वास देऊ इच्छितो की, पुणे यापेक्षाही अधिक शांतताप्रिय व सुरक्षित राहील व ते ठेवण्यासाठी पोलीस तत्पर आहेत. पोलिसांवर विश्वास ठेवावा.
– अमितेशकुमार, पोलीस आयुक्त