संग्रहित फोटो
पुणे : मोबाईल चोरट्यांचे धाडस वाढत आहे. चक्क पोलीस चौकीसमोरच ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. केसरी वाड्याकडून नारायण पेठकडे जात असताना केळकर रस्त्यावरील नारायण पेठ पोलीस चौकीसमोर ही घटना घडली आहे. याबाबत ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार नारायण पेठेतील सोसायटीत राहायला आहेत. दोन दिवसांपूर्वी ते रात्री पावणेअकराच्या सुमारास जेवण करुन फेरफटका मारण्यास बाहेर पडले होते. चोरट्याने नारायण पेठ पोलीस चौकीजवळ तक्रारदाराचा मोबाइल चोरून नेला. मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याचे वय अंदाजे २० ते २२ वर्ष आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात चंदन चोरांचा सुळसुळाट; बंगल्यात घुसून झाडे चोरली
पुणे शहर परिसरात गेल्या काही महिन्यांपासून पादचारी नागरिकांकडील मोबाइल तसेच दागिने चोरुन नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. शहरात मोबाइल चोरीच्या दररोज दोन ते तीन घटना उघडकीस येत घडतात. मोबाइल चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. मोबाइल चोरीसह पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने चोरीच्या घटना वाढत आहेत. मोबाइल चोरल्यानंतर ते परत मिळण्याची शाश्वती नसते. चोरलेल्या मोबाइलमध्ये तांत्रिफ फेरफार करुन त्याची परराज्यात विक्री केली जाते.
महिलांकडील मोबाइल लंपास
पुणे शहरात दुचाकीस्वार चोरट्यानी धुमाकूळ घातला असून, पादचारी महिलांकडील दागिने तसेच मोबाइल चोरून नेण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. प्रभात रस्त्यावरील हिरवाई उद्यान येथे दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेकडील मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली. नगर रस्त्यावरील वाघोली भागात दुचाकीस्वार महिलेच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेले, तर हडपसरमध्ये ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न झाला. सातत्याने या घटना घडत असताना पोलिसांना मात्र या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे वास्तव आहे. याप्रकरणी ५२ वर्षीय महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक १५ परिसरातील सोसायटीत राहायला आहेत. त्या बुधवारी सायंकाळी प्रभात रस्ता परिसरातील हिरवाई उद्यान परिसरात चालायला गेल्या होत्या. तेथून त्या घरी निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मोबाइलवर वहिनीचा फोन आला. त्यामुळे त्या मोबाइलवर बोलत पायी चालत असताना गल्ली क्रमांक १५ परिसरातील सिंबायोसिस शाळेसमोर महिलेच्या हातातील २० हजारांचा मोबाइल चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. चोरट्यांनी हेल्मेट परिधान केले होते. सहायक पोलीस फौजदार राजेंद्र मारणे तपास करत आहेत.