अक्कलकोट : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर रविवारी अक्कलकोट येथे शिवधर्म फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांकडून काळी शाई फेकून हल्ला करण्यात आला. या घटनेनंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. या हल्ल्याचा निषेधार्थ शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भाजपवर थेट निशाणा साधला आहे. अंधारे यांनी आरोप केला की, हल्ला करणारा दीपक काटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून भाजपचा सक्रिय पदाधिकारी आहे. तसेच तो भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय असल्याचा दावाही त्यांनी केला.
त्याचवेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र अंधारे यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हल्ल्याप्रकरणी संबंधित अधिक तपास सुरू असून, यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली जात आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, “प्रविण गायकवाड यांच्या हल्ल्याशी भाजपचा काहीही संबंध नाही. अशा खालच्या पातळीचं कृत्य करणं भाजपच्या रक्तात नाही.” तसेच, “प्रविण गायकवाड यांच्यासोबत जे घडलं त्याची चौकशी झाली पाहिजे. आरोपी भाजपचा कार्यकर्ता असला, तरी कायद्यानुसार कारवाई व्हावी,” अशी मागणीही त्यांनी केली. सुषमा अंधारे यांच्या आरोपांचं खंडन करत बावनकुळे म्हणाले, “नेते आणि मंत्री यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते फोटो काढतात, त्यामुळे फक्त फोटोवरून कोणाचे संबंध जोडले जाऊ नयेत. पोलिसांनी या प्रकरणात योग्य ती कारवाई करावी,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी राज्यातील विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या घटनेनंतर विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाले असून, त्यांनी सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा
प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. “ही घटना अतिशय लाजीरवाणी आहे. हल्लेखोराच्या जवळ पिस्तूल होते, पुणे विमानतळावर ते पिस्तूल सापडले. तरीही गुन्हेगार मोकाट फिरत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. त्या पुढे म्हणाल्या, “या प्रकरणी कठोर कारवाई झालीच पाहिजे. जर कारवाई झाली नाही तर आम्ही दिल्ली दरबारी जाऊन संसदेत हा मुद्दा मांडू. प्रविण गायकवाड यांना तात्काळ सुरक्षा दिली पाहिजे.”
5 कोटींचा व्हिला, आलिशान घरे आणि महागड्या गाड्या…, सायना नेहवाल आहे तरी किती श्रीमंत?
शिवसेना (ठाकरे गट)चे खासदार संजय राऊत यांनीही भाजपवर जोरदार टीका केली. “प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारे भाजपने पोसलेले डावे होते. आता या गुन्हेगारांवर जन सुरक्षा कायदा (MPDA) लावणार का?” असा सवाल त्यांनी केला. राऊत पुढे म्हणाले, “राज्यात कुठेही, कुणालाही मारलं जातंय. सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांना बाहेर पडतानाही भीती वाटते. भाजपची गुंड टोळी कधी कुणावर हल्ला करेल सांगता येत नाही. फडणवीस सरकारने महाराष्ट्राला गुंड राष्ट्र बनवले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. दरम्यान, या हल्ल्याची चौकशी सुरु असून, घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे.