railway ticket ( फोटो सौजन्य : social media)
राज्यभरातील प्रवाशांची फसवणूक करून आर्थिक लूट करणाऱ्या रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने गुरुवारी मलकापूर येथील पब्लिक रिझर्वेशन सेंटरवर (पीआरसी) कारवाई करत तब्बल १० लाख रुपयांहून अधिक किमतीची १८२ रेल्वे तिकिटे जप्त केली. या प्रकरणात संजय चांडक आणि प्रसाद नावाच्या दोन दलालांना अटक करण्यात आली असून, या दोघांचे संबंध मुंबईतील कुख्यात ‘ठाकूर गँग’ सोबत असल्याचे उघड झाले आहे.
सोलापूर हादरलं! 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला पुरलेल्या अवस्थेत
काळाबाजाराचा गुप्त सापळा यशस्वी
मलकापूर पीआरसीवर गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली सुरु असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने विशेष सापळा रचून गुरुवारी कारवाई केली. या कारवाईदरम्यान तत्काळ कोट्यातून ३९६० रुपयांची एसी तिकिटे खरेदी करताना संजय चांडक व प्रसाद हे दोघे अडकल्याचे समोर आले.
त्यांची चौकशी केली असता ते गडबडले आणि त्यांच्या कडील बैठकस्थळांची तपासणी केली असता, १० लाखांहून अधिक किमतीची १८२ तिकिटे सापडली. यामध्ये २३ ‘लाइव्ह’ (अद्याप प्रवासासाठी वैध) तिकिटांचा आणि १५९ जुन्या तिकिटांचा समावेश आहे.
मुंबईतील ‘ठाकूर गँग’शी थेट संबंध
चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली. संजय चांडकच्या मोबाइलवरून ठाकूर गँगसोबत झालेली व्हॉट्सअॅप चॅट हिस्ट्री रेल्वेच्या पथकाच्या हाती लागली असून, या गँगचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेले असल्याचा अंदाज आहे. या गँगमार्फत मलकापूर येथून बुक केलेली तिकिटे मुंबईमार्गे विकली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बुकिंग मलकापूरमधून, विक्री मुंबईतून
या प्रकरणात जप्त केलेल्या १८२ तिकिटांमध्ये १,६१,५३५ रुपयांच्या २३ लाइव्ह तिकिटांचा आणि ८,४८,२९८ रुपयांच्या जुन्या तिकिटांचा समावेश आहे. हे सर्व मलकापूरमधून बुक करून मुंबईतील दलालांना विकण्यात आले होते. रेल्वे प्रवाशांसाठी आरक्षित असलेल्या तत्काळ तिकिटांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुन्हा नोंद, तपास सुरू
पकडण्यात आलेल्या दोघांविरुद्ध रेल्वे कायदा कलम १४३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच जप्त केलेली २३ लाइव्ह तिकिटे तत्काळ ब्लॉक करण्यात आली आहेत. पुढील तपासात या रॅकेटमधील आणखी सदस्य आणि त्यांचे नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे.
देशपातळीवरील रॅकेटचा उलगडा होण्याची शक्यता
ही कारवाई राज्यातील रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराविरुद्ध मोठे पाऊल ठरली आहे. तपास अधिक खोलवर झाल्यास मुंबईतून देशभर रेल्वे तिकिटांच्या काळाबाजाराचे संचालन करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी अशा दलालांकडून तिकिटे खरेदी न करता अधिकृत माध्यमातूनच बुकिंग करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
अश्लील चाळे करत बालिकेचा विनयभंग; नराधमाने दुकानात बोलावलं अन्…