
लग्नाच्या केवळ 24 तासांतच नवरी गेली पळून; सुखी जीवनाचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला गंडा
आळेफाटा : लग्नाच्या स्वप्नांसोबत संसाराची नवी सुरुवात करण्याची तयारी सुरू असताना एका तरुणाच्या आयुष्यात फसवणुकीचे वादळ घोंघावले. विवाह झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत नवरी घरातून पसार होण्याच्या तयारीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नवरीसह चौघांविरोधात आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील एकरूखे येथील अजय भीमराज रोहोम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात संगीता शिंदे (आळे),अमोल पिंजारी (श्रीरामपूर), सोनाली भोसले (परतूर,जालना), राधा रमेश काळे (जालना) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
मध्यस्थांमार्फत संपर्क झाल्यानंतर अजय यांना राधा काळे हिचे स्थळ दाखवण्यात आले. विवाहासाठी मोठ्या रकमेची मागणी करण्यात आली. २० जून रोजी आळे येथे विवाह पार पडला आणि त्यासाठी संबंधित एजंटकडे १ लाख ६० हजार रुपये देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुसऱ्या दिवशी कोपरगाव येथे विवाहाचे उर्वरित विधी पार पडले. नववधूला घरी आणल्यानंतर सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र होते. मात्र, सायंकाळी घरासमोर काळ्या काचा असलेली पांढरी कार येऊन थांबल्याने घडामोडींना वेगळे वळण मिळाले. कार दिसताच नवरी घाईघाईने तिच्याकडे जाऊ लागल्याने कुटुंबीयांना संशय आला.
Mumbai News : वर्सोव्यातील पदपथ केले मोकळे ! पादचाऱ्यांची अडवणूक करणाऱ्या १७ व्यावसायिकांवर बडगा
यानंतर झालेल्या चौकशीत धक्कादायक बाब समोर आली. लग्नानंतर ठरलेल्या योजनेनुसार घरातून निघून जाण्याचा आणि व्यवहारातून मिळालेल्या पैशांमधील हिस्सा घेण्याचा कट रचल्याचे उघड झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे विवाहाच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीच्या नव्या पद्धतीबाबत चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः विवाहासाठी मध्यस्थांवर अवलंबून राहणाऱ्या कुटुंबांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
फ्लॅट देण्याच्या बहाण्याने एकाला गंडा
दुसऱ्या एका घटनेत, फ्लॅट देण्याच्या बहाण्याने विश्वास संपादन करून ३२ लाख रुपये घेऊन तोच फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विक्री केला. नंतर ३२ पैकी २० लाख रुपये परत देऊन उर्वरित १२ लाख रुपये परत न देता फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात ४४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, रविंद्र सखाराम तागुंदे (रा. वारजे) व कैलास दत्तात्रय भुंडे (रा. बावधन) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.