बेदम मारहाण करून दारूड्या भावाची हत्या
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना नागपुरात मोठ्या भावांनी मिळून दारूड्या धाकट्या भावाची बेदम मारहाण करून हत्या केली. यातील धक्कादायक बाब म्हणजे आई आणि वहिणीनेही त्यांना साथ दिल्याचे समोर आले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.
सुधीर पंढरीनाथ खंडारे (वय ४०, रा. इरोज सोसायटी, शिवनगर) असे मृताचे नाव आहे. आरोपींमध्ये सुधीरचा मोठा भाऊ योगेश खंडारे (५६), राजेश खंडारे (४३), रुपा योगेश खंडारे (५२) आणि आई कौशल्या खंडारे (७०) यांचा समावेश आहे. मोठ्या भावांनी मिळून दारूड्या धाकट्या भावाची बेदम मारहाण करून हत्या केली. नंतर बाथरूममध्ये पडून जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा देखावा करत हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शवविच्छेदन अहवालाने त्यांचा हा प्रकार उघडकीस आला.
हेदेखील वाचा : Pune Crime: रस्ता न दिल्याच्या वादातून कुख्यात घायवळ टोळीचा गोळीबार; तीन राउंड फायर, गंभीर जखमी
दरम्यान, पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून नव्याने तपास सुरू केला असून, आरोपी भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे. कुटुंबातील इतर सदस्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.
बाथरूममध्ये पडून जखमी?
2 सप्टेंबरच्या सकाळी सुधीर घरच्या बाथरूममध्ये जखमी अवस्थेत आढळला होता. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. चौकशीदरम्यान कुटुंबीयांनी रात्रीला बाथरूममध्ये पडला असेल. नळावर आदळल्याने डोक्याला गंभीर मार लागून त्याचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
शवविच्छेदन अहवाल आला अन् बिंग फुटले
शवविच्छेदन अहवालात डोक्यावर काहीतरी जड वस्तूचा सतत प्रहार झाल्याने सुधीरचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. तेव्हा नळावर आदळल्याने अशाप्रकारची जखम होत नसल्याचा खुलासा केला. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी सुरू केली. प्रत्येकाने माहिती नसल्याचेच सांगितले.
दारूच्या नशेत घालत असे दररोज वाद
सुधीरला दारूचे व्यसन होते. तो कुठलाही कामधंदा करत नव्हता. आरोपी योगेश हा प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय करतो, तर राजेश अर्धांगवायू झाल्यापासून घरीच राहतो. योगेशवरच संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी होती. सुधीर दररोज दारूच्या नशेत घरी येऊन वाद घालत होता.
पोलिसांनी अधिक चौकशी केली अन्…
पोलिसांनी योगेश आणि त्याची पत्नी रूपा हिला ताब्यात घेतले. दोघांचीही कसून विचारपूस केली असता १ सप्टेंबरच्या रात्री वाद झाल्याचे समोर आले. या दरम्यान कुटुंबातील सदस्यांनीच सुधीरला जबर मारहाण केली. डोक्यावर लोखंडी वस्तूने वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून योगेश आणि रूपाला अटक केली.