
पाटसच्या यात्रेवर गुन्हेगारीचे सावट, नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण; पोलिसांनी वेळीच लक्ष घालण्याची मागणी
पाटस : दौंड तालुक्यातील पाटस ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराजांची पारंपरिक यात्रा येत्या ५, ६ नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. मात्र, यंदाच्या यात्रेवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या टोळ्या आणि समाजविघातक घटकांचे सावट असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रा कमिटीच्या वतीने दोन दिवसीय धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पाटस हे मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्याने यात्रेच्या निमित्ताने हजारो भाविक आणि पाहुणे गावात दाखल होतात. परंतु अलीकडच्या काही घटनांमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची अलीकडील घटना गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. या घटनेत आरोपीला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली असली, तरी कोणताही सामाजिक किंवा धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
दोन-तीन गटांमध्ये धुसफूस सुरू
पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट किंवा मेसेज टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. तरीही, मागील काही महिन्यांपासून पाटस परिसरात दोन-तीन गटांमध्ये धुसफूस सुरू असून, काही तरुण गुन्हेगारी प्रवृत्तींकडे वळताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी चौफुला येथील तमाशा कार्यक्रमात झालेल्या कोयत्याच्या हल्ल्याने याच गोष्टीची जाणीव करून दिली आहे.
यात्रेतील सुरक्षेचे नियोजन करण्याची मागणी
स्थानिक नागरिकांच्या मते, यात्रेतील गर्दीचा फायदा घेऊन जुन्या वादाचा वचपा काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी चर्चा सध्या गावात सुरू आहे. यात्रेदरम्यान मंदिर परिसरात आणि पाळणा स्थळी टवाळखोरांकडून त्रास देणे, महिला व मुलींशी गैरवर्तन करणे, तसेच व्यापाऱ्यांना धमकावण्याच्या घटनाही मागील वर्षी घडल्या होत्या. त्यामुळे यंदा या प्रकारांना आळा बसावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. स्थानिक पुढारी आणि यात्रा कमिटीने केवळ बघ्याची भूमिका न घेता पोलिस प्रशासनाला सक्रीय सहकार्य करणे आवश्यक आहे. जो कोणी कायदा तोडेल त्याला राजकीय किंवा सामाजिक पाठबळ न देता कठोर कारवाई व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच, दौंड तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत आणि नागरिकांची संयुक्त बैठक तातडीने घेऊन यात्रेतील सुरक्षेचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी पाटस येथील नागरिकांनी केली आहे.