शिक्रापुरात कंटेनरचालकाकडून 42 लाखांच्या मालाचा अपहार; चौघांवर गुन्हा दाखल
शिक्रापूर : शिक्रापूर (ता.शिरुर) येथील पुणे-अहिल्यानगर महामार्गाने जाणाऱ्या एका कंटेनर चालकाने कंटेनरमधील तब्बल 42 लाख रुपयांच्या मालाचा अपहार केल्याची घटना घडली. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कंटेनर चालक लूमसिंग रावत व केतन कामभला या दोघांसह एका ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापक व सुपरवायझरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर (ता.शिरुर) येथील पुणे-अहिल्यानगर रस्त्याने आधुनिक ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून एका कंटेनरमधून (जे जे ०३ बी झेड ५९१३) चालक लूमसिंग रावत हा तब्बल 42 लाख 23 हजार 130 रुपयांचा सोलरचा माल घेऊन अहिल्यानगर येथे जात असताना सदर माल वेळेत तेथे पोहचला नाही. तसेच चालकाचा फोन लागला नसल्याने आधुनिक ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक तरुण ओमप्रकाश यांनी चौकशी केली असता कंटेनर बरेच वेळ शिक्रापूरमध्ये हॉटेलसमोर उभा असल्याचे जीपीएसच्या माध्यमातून दिसून आला.
तेव्हा त्यांनी शिक्रापूरमध्ये येत हॉटेलच्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता कंटेनर चालकाने भावना रोडलाईन्सच्या मालकीच्या कंटेनरमध्ये सर्व माल क्रेनच्या सहाय्याने भरुन घेऊन अपहार करत निघून गेल्याचे समोर आले.
याबाबत तरुण ओमप्रकाश शर्मा (वय ३१ वर्षे रा. डोंबिवली ईस्ट, ठाणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी कंटेनर चालक लूमसिंग रावत, भावना रोडलाईन्सचे चालक केतन कामभला, व्यवस्थापक बलबीर, सुपरवायझर संजय (पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.