मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने दाम्पत्याची फसवणूक; दागिन्यांसह केला पोबारा
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यात फसवणुकीच्या घटना लक्षणीय आहेत. असे असताना आता मूल होण्याचे औषध देण्याच्या नावाखाली दाम्पत्याची फसवणूक करण्यात आली. तसेच त्यांचे दागिने घेऊन भोंदूबाबा पसार झाला होता. नंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत भोंदूबाबास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे.
नागेश राजू निकम (वय ३६, रा. निमनिरगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिरज तालुक्यातील एका गावात ही घटना घडली होती. या दाम्पत्याला मूलबाळ होत नव्हते. याचा फायदा घेत संशयित नागेश निकम याने त्यांना मूल होण्याचे औषध देण्याचे आमिष दाखवले.
गेल्या रविवारी ३१ ऑगस्ट रोजी तो त्यांच्या घरी आला. औषध देण्यापूर्वी त्याने धार्मिक विधी करण्याचे नाटक केले. त्याने दाम्पत्याला घरातील देवघरात बसवले आणि महिलेच्या अंगावरील सर्व दागिने एका कापडात बांधून एका हंड्यात ठेवण्यास सांगितले. त्यानंतर दाम्पत्याला २० मिनिटे एकाच जागी बसून राहण्यास सांगितले आणि आपण मंदिरात जाऊन येतो, असे खोटे सांगून तो दागिने घेऊन पसार झाला.
दरम्यान, नागेश निकम हा माधवनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्याच्या गाडीत दाम्पत्याचे फोटो आणि हंडा सापडला.
विदर्भातही घडल्या घटना
या प्रकारची मोडस ऑपरेटी वापरून चोरट्यांनी मूल होण्याचे कारण देत दाम्पत्यांस लुटल्याच्या घटना विदर्भात घडल्या आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत या चोरट्यांनी काही गुन्हे केलेत का? याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.