दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला विटाने मारहाण करून ऐवज लांबवला; पोलिसांना माहिती मिळताच...
अकोला : एका दाम्पत्याला विटाने मारहाण करून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी (दि.12) बडनेरातून अटक केली. प्रमोद ऊर्फ माचीस संभाजीराव धोरपडे (वय 30, रा. हमालपुरा, यवतमाळ रोड, बडनेरा) व दिलीप ऊर्फ पांडू अंबोरे (वय 26, रा. बोरगाव, ता. अकोला, ह.मु. पवन नगर झोपडी, यवतमाळ रोड, बडनेरा) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
लोणी पोलिस ठाण्यात 31 मार्च रोजी चित्रा सिध्दार्थ मस्के (वय 21, रा. ब्राम्हणगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ) यांनी या घटनेची तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, चित्रा या पती व लहान मुलीसह 30 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता दुचाकीने बडनेरा येथील मयुर नारळे यांच्या घरी वास्तू शांतीच्या कार्यक्रमांसाठी गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून त्या पतीसह दुचाकीने बडनेरा येथून धानोरा फर्शीकडे जात होते. त्यावेळी लोणी गावच्या पुलाजवळ रात्री पावणे अकराच्या सुमारास त्यांच्या मागून एक दुचाकी आली आणि त्यांनी मस्के यांच्या दुचाकीसमोर त्याची दुचाकी आडवी केली.
त्यावेळी त्या दुचाकी मागे बसून असलेला व्यक्ती हा खाली उतरला आणि त्याने चित्रा यांच्या पतीला विटीचा तुकडा उचलून मारला. त्यामुळे त्यांचे पती सिध्दार्थ हे खाली कोसळले व त्यांच्या डोक्यातून रक्त निघू लागले.
दरम्यान, त्या अज्ञात आरोपींनी चित्रा यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतली आणि तेथून दुचाकीने अकोला ते वाशिम रोडने पळून गेले. या घटनेनंतर मस्के दाम्पत्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील काही लोक जमा झाले. त्यानंतर सिध्दार्थ मस्के यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. या घटनेनंतर केलेल्या तक्रारीवरून लोणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला.
आरोपींचा पोलिसांनी घेतला शोध
सदर गुन्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक पुराव्यावरुन तसेच गुप्त माहितीवरून आरोपींचा शोध घेतला. या गुन्ह्यात बडनेरातील माचीस नामक आरोपीचे नाव पुढे आले. या माहितीवरून पोलिसांनी बस स्थानक परीसरात सापळा रचून आरोपी प्रमोद ऊर्फ माचीस संभाजीराव धोरपडे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने त्याचा साथीदार दिलीप ऊर्फ पांडू बाबुराव अंबोरे याच्यासोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली.