
पतीच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह सासूला सुनावली शिक्षा; नेमकं प्रकरण काय?
कोमल दीपक चौधरी (वय ३१) आणि शालिनी कृष्णा कोल्हे (वय ५५) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) नुसार, न्यायालयाने दोषी ठरविले. कोमलचा पती दीपक चौधरी यांनी २४ नोव्हेंबर २०१५ रोजी राहत्या घरी आत्महत्या केली आहे. त्यांच्या बहिणीने पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
दीपक आणि कोमलचा विवाह २०१० मध्ये झाला. या दोघांचाही हा दुसरा विवाह होता. त्यांना एक मुलगी आहे. दीपक तळेगाव दाभाडे येथील एका नामांकित कंपनीत काम करत होता. कोमलला ऐषआरामात जगण्याची सवय होती. त्यासाठी ती दीपकला शुल्लक कारणांवरून त्रास द्यायची. त्याला मारहाण करून उपाशी ठेवत असे. त्याच्या आईला शिविगाळ करत असे. मानसिकदृष्ट्या अस्थिर अवस्थेत असतानाही, कोमल व तिची आई त्याच्याशी भांडत राहिल्या. त्यामुळे त्याने एका रिकाम्या फ्लॅटमध्ये गळफास घेत जीवन संपविले.
आत्महत्या करण्यापूर्वी दीपकने लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असून, त्याला तिची आई जबाबदार असल्याचे नमूद केले होते. या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील प्रदीप गेहलोत यांनी बाजू मांडली. त्यांनी दीपकची आई, तक्रारदार बहीण, सोसायटीचा सुरक्षारक्षक, त्याचे मित्र अशा १४ जणांची साक्ष नोंदविली. कोमलच्या छळाचा अनुभव घेतलेल्या पहिल्या पतीची साक्ष आणि आत्महत्येपूर्वी दीपकने लिहिलेली चिठ्ठी आरोपींविरोधात दोषसिद्धीसाठी महत्त्वाचा पुरावा ठरला. त्या आधारे न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली.