crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
गोंदिया: गोंदियायच्या सालेकसा तालुक्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. २ पोत्यांमध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याचे समोर आले आहे. या मृतदेहाची ओळख पटली असून तरुण हा मध्यप्रदेशचा असल्याचे समोर आले आहे. मृतकाचे नाव शुभम वाहने (26) रा. दैतबर्रा जिल्हा बालाघाट मध्यप्रदेश असे आहे. ही घटना सालेकसा तालुक्यातील दशरथटोला (बाह्मणी) परिसरात घडली आहे.
Crime News: अकलुजमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 13 गुन्हेगारांविरूध्द थेट MCOCA…
नेमकं काय घडलं?
शुभम वाहने हा स्पंदना मायक्रो फायनान्स कंपनीमध्ये लोन किस्त वसुलीचे काम करत होता. तो ४ सप्टेंबर रोजी सालेकसा येथे वसुलीसाठी आला होता. मात्र तो त्यांनतर परत गेलाच नाही. कुटुंबीयांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला संपर्क होत नव्हता. त्यानंतर कुटुंबीयांनी सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यांनतर २१ सप्टेंबर रोजी दशरथटोला परिसरातील शेतात दोन पोत्यांमध्ये कुजलेल्या अवस्थेत मानवी अवयव आढळले. एका पोत्यात धड तर दुसऱ्यात डोक्यासह इतर अवयव आढळले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला ओळख पटवणे अवघड होते. परंतु पोलिसांनी तपास करून हा मृतदेह शुभम वाहने याचाच असल्याचे निश्चित केले. पोलिसांनी मृतकाच्या कुटुंबीयांना संपर्क साधून ही माहिती दिली. घटनेची गंभीरता लक्षात घेता सालेकसा पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वारंवार यायचा गोंदियात
शुभम वाहने हा तरुण मध्यप्रदेशातील असून, कामानिमित्त गोंदिया वारंवार येत असे. 4 सप्टेंबरपासून तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल असताना त्याचा असा भयानक मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
ही पूर्वनियोजित हत्या…
पोलीस निरीक्षक भूषण बुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे. मृतकाच्या मृत्यूमागील कारणे, त्याचा संबंध कामाशी आहे का? शुभम हा लोन वसुलीचे काम करत असल्याने त्याचा कुणाशी वाद झाला होता का? याचा तपास केला जात आहे. या घटनेममुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन पोत्यांमध्ये वेगळे केलेले शरीराचे भाग आढळल्याने ही हत्या पूर्वनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गतीमान केला असून लवकरच आरोपींचा शोध लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.