संग्रहित फोटो
पुणे : दूरसंचार विभागाची (बीएसएनएल) केबल चोरणाऱ्या परप्रांतीय चोरांच्या चतु:शृंगी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून टेम्पो, रिक्षा, एक क्रेन, केबल, महापालिकेतील बिगारी कामगार वापरत असलेले हेल्मेट, रिफ्लेक्टिंग जॅकेट, लाइट बॅटन, लोखंडी कठडा, हातोडा, करवत, पहार असा ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरट्यांनी कामगारांसारखी वेशभूषा करून केबल चोरल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
नसरुल बिलाल मोहम्मद (वय २३, रा. हरिजन कॅम्प, मंडावली फाजलपूर, लक्ष्मीनगर, नवी दिल्ली) संजीव कुमार श्रीसेवाराम वर्मा (वय ३७ ,रा. साऊथ गणेशनगर, नवी दिल्ली), फईम अहमद शरीफ अहमद शेख (वय ४२, रा. कलवड वस्ती, लोहगाव, पुणे), वारीस फकीर मोहम्मद (वय ३५, रा. हरिजन कॅम्प मंडावली, फाजलपूर लक्ष्मीनगर, नवी दिल्ली) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक आश्विनी ननावरे, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, श्रीधर शिर्के, इरफान मोमीन, श्रीकांत वाघवले, बाबुलाल तांदळे, बाबासाहेब दांगडे, वाघेश कांबळे, तुषार गिरमे यांनी ही कामगिरी केली.
औंध भागातील परिहार चौकात बीएसएनएलकडून भूमिगत वाहिनीचे काम सुरू होते. गेल्या आठवड्यात (दि. १७ सप्टेंबर) मध्यरात्री कामगारांसारखी वेशभूषा करून चोरटे परिहार चौकात आले. त्यांनी केबल चोरून नेली. केबल चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बीएसएएनएलच्या अभियंत्यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या मदतीने चोरटे निष्पन्न केले. त्यानंतर चोरट्यांच्या टोळीला येरवड्यातील संगमवाडी भागात पकडले. त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.