संग्रहित फोटो
१० सप्टेंबर रोजी सचिनने महिलेला फोन केला. त्याने महिलेला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, महिलेने त्याला भेटण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतरही त्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्याच रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास महिलेच्या घराच्या मागील बाजूच्या दरवाजावर आवाज झाला. आवाज ऐकून महिलेने दरवाजा उघडला असता सचिन घरात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तो घरात कशाप्रकारे आला, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.
घरात प्रवेश केल्यानंतर आरोपीने बेडरूमचा दरवाजा बंद केला. महिलेने आरडाओरड केल्यास तिच्या पतीसह सासऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमकीमुळे घाबरलेल्या महिलेवर आरोपीने जबरदस्ती केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर महिलेने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचिन अनिल राठोड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलिस करीत असून, तक्रारीतील आरोपांची पडताळणी तसेच घटनेशी संबंधित अन्य बाबींचा तपास सुरू आहे.






