फोटो सौजन्य सोशल मीडिया
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील जागावाटपावरून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना शिवेंद्रसिंहराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. राज्यात महायुतीचे सरकार एकत्रितपणे काम करत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडणुकांमध्येही घटक पक्षांमध्ये समन्वय राहणे आवश्यक होते. याच भूमिकेतून जागावाटप करताना काही ठिकाणी स्वतःची ताकद असूनही तडजोड स्वीकारावी लागली.
सातारा तालुक्यात मतदानाची क्षमता आणि राजकीय ताकद अधिक असतानाही त्यानुसार जागा मिळविण्याचा आग्रह धरण्यात आला नाही. महायुतीतील इतर घटक पक्षांनाही योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी काही जागांवर पाणी सोडल्याचे त्यांनी सांगितले. हा निर्णय केवळ स्थानिक राजकीय फायद्याचा विचार करून घेतलेला नसून युतीच्या व्यापक हिताचा विचार करून घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. या संघर्षाची पुनरावृत्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत होऊ नये, यासाठी वरिष्ठ पातळीवरून विशेष प्रयत्न सुरू होते. स्थानिक पातळीवरील मतभेद वाढल्यास त्याचा परिणाम महायुतीच्या एकूण राजकीय समीकरणांवर होऊ शकतो, अशी भूमिका नेतृत्वाने घेतली होती.
त्यामुळे जागावाटप करताना सर्व घटक पक्षांना सोबत घेण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर समन्वयाची जबाबदारी सोपवली होती. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसार आपण ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान सुरू असताना शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदान केंद्राला भेट दिली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जागावाटपामागील राजकीय गणित स्पष्ट केले.
सातारा तालुक्यात सर्वाधिक मतदानाची क्षमता असतानाही इतर घटक पक्षांना संधी देण्यासाठी कमी जागांवर समाधान मानावे लागल्याचे त्यांनी मान्य केले. स्थानिक पातळीवर राजकीय ताकद असणे महत्त्वाचे असले, तरी युती टिकविण्यासाठी सामंजस्य आणि समन्वय आवश्यक असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.
दरम्यान, शिवेंद्रसिंहराजे यांच्या या स्पष्टीकरणामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील जागावाटपावर नव्याने राजकीय चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. महायुतीतील एकजूट टिकविण्यासाठी साताऱ्यातील नेत्यांनी घेतलेली माघार आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम करणार, याकडे आता लक्ष लागले आहे.






