पुणे : सायबर चोरट्यांकडून पुणेकरांना आमिष तसेच भूलथापा देऊन फसविले जात असून, तिघांना तब्बल ६८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक तसेच टास्कच्या बहाण्याने फसवणूक केली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात २७ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. त्यानूसार, इन्स्टाग्राम अॅप्लिकेशन धारकावर गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार ३० जुलै २८ ऑगस्ट २०२४ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार धानोरीत राहण्यास आहेत. ते खासगी नोकरी करतात. दरम्यान, त्यांना इन्स्टाग्रामवरून सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. त्यांना एक अॅप्लिकेशन पाठवत त्यात एक लिंक पाठवली. त्यांना शेअर मार्केटमधील गुंतवणूकीची माहिती दिली. त्यांनी गुंतवणूक केल्यानंतर काही वेळा नफा दिला. त्यांचा विश्वास संपादन केला आणि नंतर त्यांना तब्बल २६ लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगत त्यांची फसवणूक केली आहे.
दुसऱ्या घटनेत देखील ४४ वर्षीय व्यक्तीची ३० लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार एरंडवणा येथे राहतात. त्यांना चोरट्यांनी वेगवेगळी प्रलोभने दाखवली. तसेच, त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण या करत आहेत.
टास्कच्या बहाण्याने ११ लाखांची फसवणूक
टास्क पुर्ण केल्यानंतर जादा परतावा देण्याच्या बहाण्याने एकाची ११ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांत ३९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार टिंगरेनगरमध्ये राहतात. त्यांना ऑनलाईन टास्क पुर्ण केल्यानंतर जादा नफा मिळेल अशी बतावणी करून चोरट्यांनी वेगवेगळ्या टास्कसाठी ११ लाख २७ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र, नफा किंवा मुळ रक्कम न देता फसवणूक केली आहे.