
पोलिसांचंही बँक खातं नाही सुरक्षित ! सायबर चोरट्यांनी तब्बल साडेआठ लाखांना घातला गंडा
मंगळवेढा : मंगळवेढा येथे आरटीओ ई-चालानच्या नावावर एका पोलीस हवालदाराच्या बँक खात्यातून 8 लाख 49 हजार रुपये काढून घेण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात हॅकरविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या घटनेमुळे मंगळवेढ्यात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास आता केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी नागेश निंबाळकर हे गेल्या दोन वर्षांपासून मंगळवेढा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार या पदावर नोकरी करत असून, वडील शेती व्यवसाय करत असल्याने त्यांच्या कुटुंबियाची उपजीविका त्यावर चालते. वडिलाच्या शेती उत्पन्नातून येणारे पैसे हे फिर्यादीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया सांगोला येथील सेव्हिंग खात्यावर ठेवत असतात. सोमवारी (दि.22) फिर्यादी हे मंगळवेढ्यात असताना व्हॉट्सअॅपवर फिर्यादीच्या ओळखीचे विक्रांत भोसले (रा.धायटी) यांच्या व्हॉटसअॅपवर एक आरटीओ ई-चालान अॅपवर PDF फाईल आली होती.
फिर्यादीने आरटीओची चलन पावती आहे, असे समजून ती ओपन केली असता समोर माहिती भरण्यासाठी इंग्रजीमध्ये नेक्स्ट असे आले. त्यावेळी फिर्यादीने Next…Next असे करत गेले असता शेवटी पे-यूपीआय 50 रुपये चार्ज आल्याने फिर्यादी हे बाहेर पडले. त्यानंतर SMS आले नाहीत. मंगळवारी (दि.23) सकाळी 8.41 वाजता फिर्यादीने मोबाईल चेक केला असता त्यावर मोबाईल रजिस्ट्रेशन एसबीआय अकाऊंट असा मेसेज आला.
पैसे कट झाल्याचा आला मेसेज
त्यानंतर congratulations Successfully असा मेसेज आला. ओटीपी नंबरही आला. त्यानंतर 11.30 वाजता खात्यामधून पैसे कट झाल्याचे निदर्शनास आले. फिर्यादीने तात्काळ सायबर हेल्पलाईनवर कॉल करुन त्यांना माहिती दिली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे करत आहेत.
पुण्याच्या उद्योजक पती-पत्नीवर गुन्हा
दुसऱ्या एका घटनेत, वाळूज औद्योगिक वसाहतीतील के. पी. सेल्स कार्पोरेशन कंपनीकडून पाईप व फिटिंगचे साहित्य खरेदी करून पुण्याच्या मिन्सुन इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. संचालकांनी संगणमत करुन फसविण्याच्च्या उद्देशाने जाणीवपुर्वक व्यवहार असक्रीय असलेल्या बँकेचे चेक देऊन तसेच विश्वासघात करुन पैसे आज देतो, उद्या देतो अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन ९१ लाख ८२ हजार ७८९ रुपयाची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी पुण्याच्या उद्योजक पती-पत्नीवर २४ डिसेंबर गुन्हा दाखल करण्यात आला.