दौंड : बदलापूर येथे अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच दौंड तालुक्यातील मळद येथील नवीन माध्यमिक विद्यालय मध्ये शिक्षकांनी विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस झाली आहे. या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरून गेला आहे.
दौंड तालुक्यातील मळद मधील नवीन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष भीमराव वाखारे व शिक्षक बापूराव साहेबराव धुमाळ या दोघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विद्यालयातील शिक्षकांनी शालेय विद्यार्थींनींशी व्हाट्सअपवर अश्लील मेसेज पाठवने, व्हिडिओ कॉल करून अश्लिल हावभाव करणे, अभ्यास आणि शिकवण्याच्या नावाखाली पाठीवरून आणि छातीवरून हात फिरवणे, ब्लॅकमेल करत लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या शिक्षकांकडून इयत्ता 7 वी, 8 वी, 9 वी मधील शिकत असणाऱ्या 8 ते 9 विद्यार्थिनींंना ब्लॅकमेल करून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला असून, पालकांनी संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मुख्याध्यापक सुभाष वाखारे व शिक्षक बापूराव धुमाळ यांच्यावर दौंड पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा व फास्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.